Homeमहाराष्ट्रSS UBT Vs BJP : भाजपच्या शहा - फडणवीसी राजकारण्यांनी महाराष्ट्र गलितगात्र...

SS UBT Vs BJP : भाजपच्या शहा – फडणवीसी राजकारण्यांनी महाराष्ट्र गलितगात्र केला, ठाकरे संतापले

Subscribe

भाजपाला डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्याच शिवसेनेवर घाव घालणाऱ्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते. अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपवर आणि राज्यातील एकूणच राजकारणावर ताशेरे ओढले आहेत.

Dirty Politics in Maharashtra : मुंबई : जो भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात टाचेएवढाही नव्हता. त्या भाजपाला डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्याच शिवसेनेवर घाव घालणाऱ्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते. अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपवर आणि राज्यातील एकूणच राजकारणावर ताशेरे ओढले आहेत. (shivsena ubt criticises bjp shah fadnavis over dirty politics in maharashtra)

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या विशेष लेखात त्यांनी बाळासाहेबांचे कर्तृत्व, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठीचे त्यांचे काम अशा सगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यासोबतच विद्यमान राजकारणी, ज्या भाजपला महाराष्ट्रात पाय रोवून उभं राहण्यासाठी मदत केली त्या भाजपवर आणि सध्या सुरू असलेल्या वाईट राजकारणावर सडेतोड टीका केली आहे.

हेही वाचा – Dirty Politics : महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीतील गुजराती राज्यकर्त्यांनी ‘पंक्चर’ केला, ठाकरे गटाची घणाघाती टीका

ठाकरे म्हणतात, महाराष्ट्राची आजची अवस्था स्वाभिमानाची ‘सुंता’ झाल्यासारखीच दिसत आहे. महाराष्ट्राचे करारीपण संपले आहे. हिमालयाच्या मदतीस जाणाऱ्या सह्याद्रीचे शिखर आणि पाय दिल्लीश्वरांनी छाटले आहेत. अमित शहांसारखे लोक महाराष्ट्रात येतात. भाषणे करतात. आपल्या भाषणात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाइलाजाने घेतात, पण बाळासाहेबांनी महाराष्ट्र रक्षणासाठी निर्माण केलेली शिवसेनारूपी कवचकुंडले याच अमित शहांनी ‘मोडून’ ती मोड कुणा तोतया शिंदेच्या हाती सोपवली.

अमित शहांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस शह देण्यासाठी एकनाथ शिंदेसारखे ‘तोतये’ सदाशिवभाई निर्माण केले. शिवसेना फोडण्यासाठी बारभाई कारस्थाने करून महाराष्ट्र विकलांग, गलितगात्र केला, पण ही तात्पुरती स्थिती आहे. पानिपताच्या राखेतून महाराष्ट्र आणि मऱ्हाठा पुन्हा उठला व लढत राहिला. त्याचे शौर्य अटकेपार गेले हे तोतयांचे राज्य महाराष्ट्रात निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरे यांची पदोपदी आठवण येत आहे. महाराष्ट्र आज दरोडेखोरांच्या हातात आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शिवसेनाप्रमुखांच्या संघर्षातून निर्माण झालेले आणि टिकवलेले मराठी राज्य ते हेच काय? मराठी माणूस जाती-पोटजातीत फाटला आहे. इतका फाटला आहे की, त्यास ठिगळही लावता येत नाही. मराठी म्हणून ज्यांना एक केले ते मराठा-मराठेतर, ओबीसी, धनगर, माळी, वंजारी, दलित अशा तुकड्याताकड्यांत फुटून एकमेकांशी वैर घेऊन लढत आहेत. मराठी म्हणून भक्कम एकजूट उभारणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र भाजपच्या शहा-फडणवीसी राजकारण्यांनी गलितगात्र केला. महाराष्ट्रात शेतकरी मरत आहे. मराठी तरुण बेरोजगारीच्या खाईत होरपळत आहे. महिलांवर बलात्कार आणि खुनी हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्राचा उद्योग लुटून बाजूच्या गुजरातेत नेला जात आहे.

हेही वाचा – Subhash Chandra Bose : मंदिराच्या पुजाऱ्याने हिंदू अधिकाऱ्यांना निमंत्रित केले, त्यावर सुभाषचंद्र बोस म्हणाले –

स्वतःस राज्यकर्ते म्हणवून घेणारे ‘मराठे’ शिवरायांच्या महाराष्ट्राची लूट उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या धमन्यांत भरलेला स्वाभिमान आणि शौर्य दिल्लीतील गुजराती राज्यकर्त्यांनी जणू ‘पंक्चर’ केले. ‘जय श्रीराम’ बोला आणि स्वाभिमान विसरा. मराठीपण चुलीत घाला. धर्माची चिलीम फुंकून महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि मानसन्मान धुराच्या वलयात सोडून द्या, पण त्या ‘जय श्रीरामा’चा नारा आणि गर्वाने हिंदू म्हणून मिरवण्याचा वारसा त्याच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. आज त्या वारशावर दिल्लीचे भाजपाई आयत्या बिळावर नागोबासारखे बसले आहेत.

त्याग, स्वाभिमान आणि राजकीय चारित्र्य हे महाराष्ट्राचे गुण आता देशोधडीस लागले आहेत. ते पाहून स्व. बाळासाहेबांचा आत्मा आजच्या महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी करील की महाराष्ट्राची मान दिल्लीपुढे झुकवणाऱ्यांना शाप देईल? बाळासाहेबांची तपस्या आणि कष्ट सध्याच्या राज्यकर्त्यांनी मातीमोल केले. सत्ता तसेच पैसा यासाठी स्वाभिमान गहाण टाकलाच, पण महाराष्ट्राची प्रतिष्ठाही खुंटीला टांगून ठेवल्याचा आरोप त्यांनी शेवटी केला आहे.