Shivsena UBT On BJP : मुंबई : महाराष्ट्राने निरंतर अभिमान बाळगावा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते फक्त नावाचे नव्हे तर कृतीने हिंदुहृदयसम्राट होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तीचे चौघडे भारतात आणि भारताबाहेर वाजत होते. याच बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या धमन्यांत भरलेला स्वाभिमान आणि शौर्य दिल्लीतील गुजराती राज्यकर्त्यांनी जणू ‘पंक्चर’ केल्याची घणाघाती टीका बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘सामना’ या मुखपत्रात लिहिलेल्या अग्रलेखातून ठाकरे गटाने केली आहे. (shivsena ubt criticises politicians over dirty politics in maharashtra)
बाळासाहेब महाराष्ट्रभक्त कुटुंबात ते जन्मले आणि आयुष्यभर सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडत राहिले. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे यांना देशात मिळालेली लोकमान्यता थक्क करणारी आहे. सुरुवातीला मराठीची आघाडी बाळासाहेबांनी झुंजविली. त्यासाठी कुंचला, वाणी तसेच लेखणीचा वापर त्यांनी हत्यार म्हणून केल्याचे या लेखात म्हटले आहे.
बाळासाहेबांनी महाराष्ट्राला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे छत्रपती शिवरायांनंतर त्यांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त केले. मराठी स्वाभिमानाची मशाल पेटवली. पाच वर्षांच्या संघर्षानंतर मुंबईसह महाराष्ट्र मिळाल्यावरही अन्यायाच्या लाथा खात मराठी माणूस थंड लोळागोळा होऊन पडला होता. त्याच्या मनात असंतोषाची ठिणगी टाकून भडका उडवण्याचे काम बाळासाहेबांनी केले.
पण महाराष्ट्राची आजची अवस्था स्वाभिमानाची ‘सुंता’ झाल्यासारखीच दिसत आहे. महाराष्ट्राचे करारीपण संपल्याची खंतही ते व्यक्त करतात. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरे यांची पदोपदी आठवण येत आहे. महाराष्ट्र आज दरोडेखोरांच्या हातात आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शिवसेनाप्रमुखांच्या संघर्षातून निर्माण झालेले आणि टिकवलेले मराठी राज्य ते हेच काय, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
मराठी माणूस जाती-पोटजातीत फाटला आहे. इतका फाटला आहे की, त्यास ठिगळही लावता येत नाही. मराठी म्हणून ज्यांना एक केले ते मराठा-मराठेतर, ओबीसी, धनगर, माळी, वंजारी, दलित अशा तुकड्याताकड्यांत फुटून एकमेकांशी वैर घेऊन लढत आहेत. मराठी म्हणून भक्कम एकजूट उभारणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र भाजपच्या शहा-फडणवीसी राजकारण्यांनी गलितगात्र केला. महाराष्ट्रात शेतकरी मरत आहे. मराठी तरुण बेरोजगारीच्या खाईत होरपळत आहे. महिलांवर बलात्कार आणि खुनी हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्राचा उद्योग लुटून बाजूच्या गुजरातेत नेला जात आहे आणि स्वतःस राज्यकर्ते म्हणवून घेणारे ‘मराठे’ शिवरायांच्या महाराष्ट्राची लूट उघड्या डोळ्यांनी पाहात असल्याची टीका देखील त्यांनी केला आहे.