Aaditya Thackeray on Guardian Minister : मुंबई : महायुती सरकारमधील पालकमंत्रिपदाचं गुऱ्हाळ काही संपता संपत नाही. बऱ्याच काळाने पालकमंत्रिपद जाहीर झाले. त्यातही काही मंत्र्यांची इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे अगदी आयत्यावेळी नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाली. यावरून विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच लक्ष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (shivsena ubt leader aaditya thackeray criticises mahayuti govt over raigad nasik guardian ministership)
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आली आहे, हे नक्की काय चाललंय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे. याशिवाय पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली आहे.
हेही वाचा – Vijay Wadettiwar : मलिदा खाण्यासाठी जिल्ह्याची मालकी? कॉंग्रेस नेते वडेट्टीवारांचा सरकारला सवाल
रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर महायुतीतील धुसफूस अगदी चव्हाट्यावर आली आहे. या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासूनच सुंदोपसुंदी सुरू होती. आता पालकमंत्रिपद जाहीर झाल्यानंतर रायगडमध्ये पुन्हा राडा झाला आहे. कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना आमदार भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी आग्रही असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. यामुळे शनिवारी रात्री भरत गोगावले समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी ठिकठिकाणी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला.
तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून देखील शिंदेंचे मंत्री नाराज आहेत. तेथेही धुसफूस सुरू आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी दावोसला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तेथून सूत्रे हलवत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी लागली आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आलीय!
हे नक्की काय चाललंय?
मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे.
पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही…— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 20, 2025
मंत्रिपद मिळवूनदेखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत असल्याचे सांगतानाच पालकमंत्री पद, बंगले ह्यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा, अशा कानपिचक्या आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिल्या आहेत. शिवाय, आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
हेही वाचा – Beed : पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा, बीडच्या पालकमंत्रिपदावरून ठाकरे गटाची टीका
जाळपोळ, दादागिरी मंत्र्यांचेच काही लोकं करणार आणि एवढी मोठी जबाबदारी स्थगित होणार? हा पॅटर्न आहे का? दुसरीकडे बीड आणि परभणीची जनता न्यायासाठी आक्रोश करत असताना, ती जनता मात्र अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मंत्री आपला स्वार्थ साधण्यात व्यस्त आहेत, मुख्यमंत्री मंत्र्यांची भांडणं- मानापमान ह्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचं हित मात्र दुर्लक्षित होतंय, अशी खंत देखील ते व्यक्त करतात.