शिवसेनेत कमालीचे नैराश्य आणि सामसूम! इतिहासाची पुनरावृत्ती!

thackeray family in shivsena

राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेनेला विशेष छाप सोडता न येणे, आमदारांची कामे न होणे, सत्तेवर अजोय मेहता आणि शरद पवार यांचाच ‘कंट्रोल’ असणे, यामुळे शिवसेनेत कमालीची मरगळ आली आहे. त्यातच पक्षाचे नेते आणि उद्धव यांचे चिरंजीव पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाची सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सुरु असलेली बदनामी आणि सीबीआयकडे सोपवण्यात आलेला या प्रकरणाचा तपास यामुळे संपूर्ण शिवसेना पक्ष सुन्न झाला असून निराशेच्याच गर्तेत सापडला आहे.

बाळासाहेबांमुळेच राज ठाकरेंवरची आपत्ती टळली!

१९९५ साली राज्यात युतीची पहिल्यांदाच सत्ता आली आणि त्यानंतर माटुंग्यात राहणार्‍या रमेश किणी खून प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव गुंतवण्यात आले. या प्रकरणामुळे व्यक्तीश: राज ठाकरे यांचे राजकीय आणि सामाजिक असे दोन्ही पद्धतीचे जबरदस्त नुकसान झाले. तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा, अमिताभ बच्चन, अमर सिंग यांच्याशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या असलेल्या मैत्रीमुळेच राज यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. राज ठाकरे यांचे काही स्वार्थी मित्र आणि त्यांच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात फारसे यश न मिळवलेल्या कलाकारांबरोबर असलेली राज ठाकरे यांची मैत्री या सगळ्यामुळेच राज यांच्यावर किणी प्रकरण शेकले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे राज ठाकरे हवालदिल झाले होते. त्यावेळी सायंदैनिक असलेल्या ‘आपलं महानगर’ मध्ये रमेश किणी प्रकरणाची दणदणीत बातमी छापून आल्यानंतर एरवी राज यांच्या भोवती असणारा मित्रांचा गोतावळा अचानक पांगला होता. या संपूर्ण प्रकरणाला त्यावेळी विरोधी पक्ष नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी जोरदार हवा दिली होती. कालांतराने या प्रकरणात राज यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तोपर्यंत राज ठाकरे यांचे अतोनात नुकसान आणि सत्ता असताना शिवसेनेची प्रचंड बदनामी झाली होती.

सध्या गाजत असलेल्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांना सोशल मिडिया आणि मिडीयातून लक्ष्य केले जात आहे. आदित्य ठाकरे हे आपल्या वडिलांसारखे विनम्र आणि शांत स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र महाविद्यालयीन आयुष्यात त्यांच्याबरोबर ज्या काही हायप्रोफाईल मंडळींची मैत्री जमली त्यामुळे चित्रपट सृष्टीतल्या मित्रमंडळींसोबत त्यांचा राबता वाढू लागला. त्यातूनच चंदेरी पडद्यावर सुमार दर्जाची कामगिरी करणार्‍या डिनो मोरीया सारख्या अभिनेत्याने आदित्य यांच्या भोवती आपल्या स्वार्थासाठी जाळे पसरले. त्यात युवासेना प्रमुख अलगद अडकले. त्यातूनच आदित्य ठाकरे यांची कधी इमारतींच्या टेरेसवर रेस्टॉरंटची मागणी सुरू झाली तर कधी नाईट लाईफ अधिकृत करण्यासाठी त्यांनी आपले राजकीय वजन खर्ची घातले. डिनो मोरीया, दिशा पटानी, राहुल बोस, सूरज पंचोली, राहुल कनान यांसारख्या मंडळींच्या गराड्यातच आदित्य आनंद मानू लागले. ही सगळी मंडळी या ज्युनियर ठाकरेंकडून आपला स्वार्थ साधत होती. आदित्य यांच्या विरोधात सगळ्यात आधी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र काढून सुशांत सिंह प्रकरणात ठिणगी टाकली. मात्र शिवसेनेतील विशेषतः टीम आदित्य समजले जाणारे कुणीही प्रतिक्रिया तर सोडाच पण युवासेना प्रमुखांना मानसिक आधार देण्यासाठीही कुणी पुढे आले नाही. याला अपवाद होते परिवहन मंत्री अनिल परब आणि खासदार संजय राऊत. काँग्रेसमधून येऊन भाजपचे नेते झालेल्या खासदार नारायण राणे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आणि ती मान्यही झाली. त्यामुळे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि शिवसेनेवरच दबाव येऊन ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीतून कारभार करत आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेलेत. सरकारने सगळा शासकीय निधी कोविड विरोधी लढाईसाठी वळवला आहे. खासदार निधीही पंतप्रधान मोदींनी कोविडसाठी घेतल्याने विभागातील कामेही ठप्प आहेत. आमदारांना ‘स्वारस्य’ असणारी बदल्यांची कामेही अजोय मेहता, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्फतच होत असल्याने तिथेही आमदारांचे काही ऐकले जात नाही. मतदार संघात विकास कामे होत नसल्याने तुम्हाला आमदार करण्याचा काय फायदा? असा प्रश्न भागाभागात विचारला जात आहे. सरकार पूर्णत: अजोय मेहता आणि पुण्यातील एका उद्योजकाच्या ’अदृश्य’ हातात गेल्याने तिथपर्यंत आमदार तर सोडाच पण मंत्रीसुध्दा पोहोचू शकत नाहीत.

आठ महिने झाले तरी महामंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. ज्या काही चिमूटभर नेमणुका झाल्यात त्यात आपली हक्काची आमदारकी सोडणारे सुनील शिंदे, केंद्रीय मंत्रीपद सोडणारे अरविंद सावंत, स्थायी समिती अध्यक्षपदी असताना एकहाती सेनाभवन उभारणीत महत्वाचा वाटा उचलणारे रविंद्र वायकर यांना वार्‍यावर सोडण्यात आले आहे. अख्ख्या दिल्लीसह देशभराची ’सफर’ करुन आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांचे पक्षात काहीही योगदान नसताना आदित्य ठाकरे यांनी त्यांना खासदारकी द्यायला भाग पाडल्याने सेनेत प्रचंड खदखद आहे. मुंबईतील आमदारांपेक्षा ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींची स्थिती प्रचंड हलाखीची आहे. सरकारमध्ये असलेल्या चार आमदारांनी मागच्या निवडणुकीसाठी जमीन, बंगला गहाण टाकून कर्ज घेतले होते. वर्षभरात ते फेडता न आल्यास त्यांना त्यावर पाणी सोडावे लागेल. अशा आर्थिक अडचणीत असलेल्या लोकप्रतिनिधींना भाजप आपल्या गळाला लावू शकते.

आदित्य ठाकरेंच्या हटवादीपणामुळे सेनेने ’मिशन १५१’ प्रकरणात आपले हात पोळून घेतले होते. पक्षातही युवासेना प्रमुख सर्वसमावेशक राजकारण न करता ‘टीम आदित्य’वर भर देण्याचाच प्रयत्न करत आहेत. आदित्य यांनी निवडलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी यांची कामगिरी यथातथाच असताना ते फक्त ‘टीम आदित्य’ सदस्य आहेत म्हणून त्यांना पुढे रेटण्याच्या प्रयत्नाने सेनेत कमालीचे नैराश्य आहे.

आता राज, आदित्य ठाकरेंच्या मदतीला येणार का?

राज ठाकरे यांचा चित्रपट सृष्टीत आजही दबदबा आहे. राज यांच्या वाणीचा दांडपट्टा चालताच शाहरुख खान असो की करण जोहर त्यांचे धाबे दणाणते आणि ते कृष्णकुंजवर धाव घेतात. राज यांची आजही सलमान खान, अमिर खान यांच्याशी व्यक्तिगत मैत्री आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर तर अनेक दिग्गज अभिनेते, निर्माते अक्षरश: गुडघ्यावर यायचे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव यांनी मात्र या क्षेत्रातील संधीसाधू लोकांपासून स्वत:ला लांब ठेवले आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या मदतीला या फिल्मी मंडळींवर दरारा असणारे काका राज ठाकरे येणार की सीबीआयची दोरी हातात ठेवणारे गृहमंत्री अमित शहा येणार याकडे नैराश्य आणि धक्क्यात गेलेल्या शिवसेनेचे डोळे लागले आहेत. हा विरोधकांनी रचलेल्या सूडनाट्याचा भाग आहे असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. त्यांच्या प्रतिक्रियेकडे बारकाईने पाहिल्यास आदित्य यांच्या समोर “काका मला वाचवा” असे म्हणण्याशिवाय पर्याय नसल्याचेच सेनेचा कानोसा घेतला असता लक्षात येते.