घरमहाराष्ट्र'हरहर महादेव'च्या वादात शिवसेनेची उडी; राज्यकर्ते बदलताच...

‘हरहर महादेव’च्या वादात शिवसेनेची उडी; राज्यकर्ते बदलताच…

Subscribe

हरहर महादेव या ऐतिहासिक चित्रपटावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या सिनेमात इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी या वादाला तोंड फोडले. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या वादात उडी घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील हरहर महादेवचा शो बंद पाडला. यावरून अटकनाट्यही रंगलं. आता या वादात शिवसेना उतरली आहे.

मुंबई – इतिहास हा जशाचा तसा कधीच बनू शकत नाही. त्याचे स्वरूप व विवरण सारखे बदलत असते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका!, असा सणसणीत सल्ला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आला आहे.

हेही वाचा जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल

- Advertisement -

हरहर महादेव या ऐतिहासिक चित्रपटावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या सिनेमात इतिहासाची मोडतोड केल्याप्रकरणी अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी या वादाला तोंड फोडले. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही या वादात उडी घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील हरहर महादेवचा शो बंद पाडला. यावरून अटकनाट्यही रंगलं. आता या वादात शिवसेना उतरली आहे. पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील!, असं या सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

इतिहासाची मोडतोड होऊ नये

- Advertisement -

इतिहास चिवडत बसू नका, नवा इतिहास निर्माण करा असा संदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच देत असत. सध्या महाराष्ट्रात इतिहासावर जे वादंग माजले आहे त्यासंदर्भात शिवसेनाप्रमुखांचे हे विचार मार्गदर्शक आहेत. ‘हर हर महादेव’ असा एक मराठी चित्रपट पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटात इतिहासाचे विकृत प्रदर्शन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत असत्य कथन केले आहे, असे आक्षेप आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी त्यावरुन या चित्रपटास विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात घुसून आंदोलन केल्याने त्यांना अटक व सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये. पण अशी मोडतोड झाल्याचे आक्षेप काल झळकलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबाबत जसे घेतले गेले तसे यापूर्वीच्या काही चित्रपटांबाबतही घेण्यात आले होते, असं या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

चित्रपटातील प्रसंग इतिहासाशी विसंगत

‘काही लोकांनी ‘तानाजी’ चित्रपटातील काही दृश्ये यानिमित्ताने समोर आणली. मध्यंतरी एका चित्रपटात अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या बाजीराव पेशव्यांना ‘बॉलीवूड’ पद्धतीने नाचताना दाखवले होते आणि त्यावरही आक्षेप घेतला गेला होता. झाशीच्या राणीवरील चित्रपटातील काही दृश्ये आक्षेपार्ह वाटल्याने करणी सेनेने दंड थोपटले होते. पृथ्वीराज चौहान यांच्यावरील चित्रपटालाही आक्षेप घेऊन इतिहासावर वादंग निर्माण करण्यात आले होते. आता काही मराठी ऐतिहासिक चित्रपटांत दाखविलेल्या प्रसंगांवरून वाद उभा राहिला आहे. महाराष्ट्राची दोनच दैवते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दोन्ही दैवतांना महाराष्ट्रच नव्हे, तर देश सदैव पुजत असतो. या दैवतांच्या प्रतिमा आणि श्रद्धांना कोणी तडे दिले तर महाराष्ट्र खवळून उठतो. आताही इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध राज्याचे वातावरण तापले आहे. ‘हर हर महादेव’ नामक चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल्याचा आक्षेप आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक प्रसंग कसे चुकीचे आहेत याबाबत एक यादीच जाहीर केली गेली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दाखविण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला. असे अनेक प्रसंग चित्रपटात असून ते इतिहासाशी विसंगत आहेत,’ असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

धर्मवीर चित्रपटातही तथ्यांशी मोडतोड

“‘पावनखिंड’ नामक एक चित्रपट मधल्या काळात आला व गेला. त्यावरही आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे पडद्यावर तसेच रंगमंचावर ऐतिहासिक नाट्य आणणाऱ्यांसमोर मोठाच यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. चित्रपट व नाटकांसाठी एक सेन्सॉर मंडळ आहे. ते सर्व तथ्यांची तपासणी करून चित्रपट प्रदर्शनास मान्यता देत असते. ते सेन्सॉर बोर्डही अशा प्रसंगी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. हे फक्त इतिहासाच्याच बाबतीत होते काय, तर तसेही नाही. राज्यकर्ते बदलताच श्रद्धास्थाने बदलतात, तसे इतिहासाचे संदर्भही बदलले जातात. महात्मा गांधी हे मागे पडतात व सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस पुढे येतात. वीर सावरकर फक्त नाव घेण्यापुरते राहतात. पंडित नेहरू तर खिजगणतीत राहत नाहीत. कारण नवा इतिहास लिहिला जातो व तो सोयीनुसार लिहिला जातो. मधल्या काळात कडवट शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एक चित्रपट प्रदर्शित केला. त्यातही अनेक तथ्यांची साफ मोडतोडच केली आहे. असे आता वारंवार घडू लागले. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या इतिहासाचा कळस रचला त्याची मोडतोड ‘गल्लाभरू’ चित्रपटांसाठी केली जाऊ नये,” अशी टीकाही करण्यात आली आहे.

इतिहासाचे विडंबन होऊ नये

‘छत्रपती शिवराय जन्मले त्या काळात संपूर्ण भारतवर्ष वणव्याप्रमाणे पसरत चाललेल्या मोगलांच्या सत्तेपुढे हतबल होत चालले होते. त्यातच सागरसीमेकडून पोर्तुगाल आदी युरोपीय राष्ट्रे भारताला सत्ताप्रसार व धर्मप्रसार यांच्या जबड्यात पकडून मगरीप्रमाणे ग्रासू पाहत होती. अशा दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडलेल्या भारतासाठी तो निराशामय काळ होता. सामान्य जनांच्या मनातून भारताच्या पुनर्निर्माणाची आशा जणू मावळली होती. अशा वेळी राष्ट्राच्या उद्धारासाठी छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. भय व निराशा यांची जळमटे जनमनातून जाळून टाकणारे दिव्य व दाहक तेज मनुष्यरूपाने प्रकट झाले! हा इतिहास आहे व तो तसाच राहील, पण इतिहास लोकप्रिय करण्याचे कार्य शाहीरांनी, कलावंतांनी, लेखक, प्रवचनकार, कीर्तनकार, नाट्य व चित्रपटांतील मंडळींनी केले हेदेखील तितकेच खरे आहे. इतिहास लोकप्रिय पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य कलाकार घेतात, पण इतिहासाचे विडंबन होऊ नये याचे भान राखणे तेवढेच गरजेचे आहे. मुळात इतिहास हा जगभरातच तसा रूक्ष विषय आहे. पुन्हा एका संशोधकाने एक संदर्भ मांडला की, तो खोडून काढणारा दुसरा संदर्भ पुढे आणला जातो हेदेखील घडतच आले आहे. इतिहास हा जशाचा तसा कधीच बनू शकत नाही. त्याचे स्वरूप व विवरण सारखे बदलत असते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही,’असा इशाराही यामाध्यमातून देण्यात आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -