हसन मुश्रीफ यांच्या विजयाबाबत कधीच शंका येत नाही, शरद पवारांकडून स्तुतीसुमने

हसन मुश्रीफ यांनी शिवस्वराज्य दिन गावांमध्ये राबवले. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला

कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या धर्माचे लोक १०० टक्केही नाहीत. पण ज्यावेळेस त्यांच्या निवडणूक प्रचाराला येतो, तेव्हा त्यांच्या सभेला खेड्यापाड्यातील सर्वसामान्य शेतकरी हजारोंच्या संख्येने आलेले दिसतात. त्यामुळे मला हसन मुश्रीफ यांच्या विजयाबाबत कधीच शंका येत नाही, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. (Shivswarajya Bhushan Award, Sharad Pawar Appreciate Hasan Mushriff Work)

सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशीतर्फे शिवस्वराज्य भूषण पुरस्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना शरद पवारांनी मुश्रीफांचं तोंडभरून कौतुक केलं.

हेही वाचा मी राजकारणात येतो, तुम्ही अभिनय क्षेत्रात या; नानांची मुश्रीफांना ऑफर 

हसन मुश्रीफ यांनी शिवाराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन सर्व गावांमध्ये साजरा करण्याची योजना राबिवली. यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.

“काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करायचं, याचे उत्तम उदाहरण हसन मुश्रीफ यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवले आहे. शिवछत्रपतींचा स्वाभिमानाचा, आत्मविश्वास वाढवणारा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक घरात जाण्यासाठी पोषक असा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. शिवस्वराज्याची आठवण करुन देणारा कार्यक्रम त्यांनी आजच्या दिवशी संबंध राज्यभर राबवला”, असं शरद पवार म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, “हसन मुश्रीफ हे कागल मतदारसंघातून येतात. कागल महाराष्ट्राच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे. कागल सोडलं की पलीकडे कर्नाटकची हद्द सुरु होते. त्यामुळे कागल अनेकदृष्टीने लोकांच्या लक्षात राहणारा मतदारसंघ आहे. सीमाभागातील बेळगाव, कारवार येथील मराठी बांधवांची महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे. त्यासाठी अनेकदा लढे झाले. या लढ्यांची सुरुवात अनेकदा कागलपासून झाली आहे. याच कागलचे गेल्या अनेक वर्षांपासून हसन मुश्रीफ प्रतिनिधित्व करत आहेत. एक काळ असा होता, कागलमधील महत्त्वाचं पीक हे तंबाखू होतं. आता कागलकरांनी तंबाखूचे पीक कमी करुन ऊसावर लक्ष केंद्रीत केले, कारखानदारी काढली. औद्योगिक वसाहत तिथे झाली आहे. किर्लोस्कर सारखे मोठमोठे कारखाने उभे राहिले आहेत. मुश्रीफांच्या माध्यमातून कागलचा चेहरामोहरा बदलला आहे.”