धक्कादायक! इम्तियाज जलील यांच्या साखळी उपोषणात बिर्याणीची दावत

छ. संभाजीनगर : जिल्ह्याच्या नामांतराला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. नामकरणाविरोधात त्यांनी ४ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र, उपोषणाच्या पहिल्याच दिवसापासून या उपोषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. उपोषणस्थळी आता बिर्याणीच्या पंगती उठल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

४ फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगर येथे जिल्ह्याच्या नामांतराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. दुपारी १ वाजल्यापासून इम्तियाज जलील यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यावेळी एक तरुण तिथे औरंगजेबाचे पोस्टर घेऊन आला होता. यावेळी येथे जोरदार घोषणाबाजीही झाली. त्यामुळे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नामांतराच्या विरोधाला होत असलेल्या उपोषणाला अनेक लहान मोठ्या संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. दुसर्‍या दिवशी एका नवरदेवाने उपोषणाला पाठिंबा दिला. मंडपात लग्न लागताच त्याने उपोषणस्थळ गाठलं आणि औरंगबादच्या नामांतराला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली. नवरदेवाचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केल्याने राज्य सरकारसह विरोधकांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच, उपोषणस्थळी जेवणाच्या पंगती उठल्या असल्याचा फोटो समाज माध्यमातून समोर आला. उपोषणस्थळी बिर्याणीची दावत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उपोषणस्थळी जेवणाच्या पंगती उठत असतील तर त्याला उपोषण म्हणायचं का? असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी उपस्थित केलाय. इम्तियाज जलील औरंदाबादचे खासदार होते. आणि औरंगाबादचेच खासदार राहणार. जिल्ह्याचं नाव बदलल्याने काहीजण नाचत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत. पण मी औरंगाबादेत जन्माला आलो आणि औरंगाबादेतच मरणार, असं म्हणत त्यांनी औरंगाबादच्या नामांतराला कडवा विरोध केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव आणला होता तेव्हाही इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला होता. जिल्ह्याच्या नामांतराला विरोध असण्या मागचं कारणही इम्तिजाय जलील यांनी यावेळी नमूद केलं, असं ट्वीट काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी केलं होतं.