Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र धक्कादायक! अमरावतीत मतमोजणीवेळी मंडल अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

धक्कादायक! अमरावतीत मतमोजणीवेळी मंडल अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Subscribe

शाहुराव खडसे असे त्यांचे नाव असून छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

अमरावती – अमरावती पदवीधर निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जवळपास 34 तास लांबली. मात्र, या मतमोजणीवेळी एका मंडल अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शाहुराव खडसे असे त्यांचे नाव असून छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

निमानी गोडाऊन येथे काल सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. कोकण, औरंगाबाद, नागपूरचा निकाल लागला तरीही अमरावती आणि नाशिकाचे चित्र स्पष्ट झाले नव्हते. रात्री मतमोजणी सुरू असतानाच शाहुराव खडसे यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

हेही वाचा – अमरावतीतही भाजपाला धक्का! मविआचे धीरज लिंगाडेंचा दणदणीत विजय

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा विजय

- Advertisement -

अमरावती पदवीधर मतदारसंघातील अंतिम निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे. तर भाजप उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव झाला आहे. तब्बल 34 तासांच्या मतमोजणीनंतर हा निकाल जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार रणजित पाटील, काँग्रेस उमेदवार धीरज लिंगाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिल अमलवार अशी तिहेरी लढत पाहायला मिळाली. या लढतीत मविआ उमेदवार धीरज लिंगाडे यांना पहिल्या पसंतीची मत मिळाली आहे. तर भाजप उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव झाला, धीरज लिंगाडे यांना 46344 मतं मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना 42962 मतं मिळाली आहे. धीरज लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय झाला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा पाच मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये मविआने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपला पराभूत केलं आहे. यात नागपूर, औरंगाबाद आणि अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत.  नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला. यामुळे तीन मतदारसंघात मविआला विजय मिळाला आहे.

- Advertisment -