धक्कादायक : खड्ड्यांमुळे महिलेने रस्त्यातच दिला बाळाला जन्म, खुरप्याने कापली बाळाची नाळ

कोल्हापूर : कोल्हापूरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्भवती ऊसतोड मजूर महिलेने खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे बाळाला रस्त्यावरच जन्म दिला आहे. सुदैवाने बाळाची आणि आई दोघेही सुखरूप आहेत.

कोल्हापूरच्या निपाणी-मुरगूड रोडवरील यमगे गावामध्ये मध्यप्रदेशातून ऊस तोडणीसाठी मजूर महिला आणि तिचे कुटुंब आले होते. प्रवासादरम्यान खराब रस्त्यामुळे तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि रुग्णवाहिका येण्यापूर्वीच तिने रस्त्यातच बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळ आणि आईला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मध्यप्रदेशातून ३२ मजूर ऊस तोडणीसाठी कोल्हापूरच्या रयत साखर कारखान्यामध्ये काम करत असून ते सध्या कासेगावात वास्तव्यास आहेत. संध्याकाळी कोल्हापुरातील तिरवडेच्या (ता. भुदरगड) दिशेने जात होते. हे कामगार आज, शुक्रवार सकाळी नऊच्या सुमारास यमगे गावाजवळ आले असता गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. महिला त्रास होत असल्याचे समजताच ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. परंतु सेनापती कापशीमधून रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याच्या बाजूला शेतामध्ये काही महिलांनी आडोसा निर्माण केला आणि किरण केसू पालवी या महिलेने बाळाला जन्म दिला.

यमगे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने बाळ आणि आई या दोघांचा जीव धोक्यातून बाहेर आला. त्यानंतर या दोघांना मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

यमगे मुरगूड दरम्यानचा रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून खराब झाला आहे. हा खराब रस्ता लोकांच्या जीवावर उठण्याआधी प्रशासनाला जागे व्हावे लागेल.

खुरप्याने कापली बाळाची नाळ
रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात बाळाला जन्म दिल्यानंतर सुविधा नसल्याने सोबत असलेल्या महिलांनी बाळाची नाळ खुरप्याने कापली. यमगे गावातील डॉ. रुपाली लोकरे, आशासेविका सरिता एकल, सुनीता पाटील, सुनीता कांबळे यांनी धाव घेऊन उपचार केले आणि त्यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या या दोघांवर उपचार सुरु असून बाळ आणि आई सुखरूप आहेत.