धक्कादायक! रुग्णवाहिका बंद पडल्याने शिवसेनेच्या माजी आमदाराचा डोंबिवलीत मृत्यू

Suryakant Desai Dies | सदोष रुग्णवाहिका सेवेत ठेवल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने सूर्यकांत देसाई यांना जीव गमावावा लागला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

suryakant desai

डोंबिवली – एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिका बंद पडल्याने डोंबिवलीतील माजी आमदार सूर्यकांत देसाई (Former MLA Suryakant Desai) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सूर्यकांत देसाई यांच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून रुग्णवाहिका चालकाविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सूर्यकांत देसाई यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिंलेटवर ठेवण्याची वेळ आली. परंतु, रुग्णालयात वेंटिलेटर नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येणार होते. त्यासाठी रुग्णालयाने रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिका आधीच नादुरुस्त होती. तरीही ही रुग्णवाहिका सेवेत होती. देसाई यांना रुग्णवाहिकेत नेले तेव्हा प्लस रेट ७० होता. ही रुग्णवाहिका ममता रुग्णालयाच्या दिशेने जात असतानाच मध्येच बंद पडली. त्यामुळे नातेवाईकांनी मंजुनाथ शाळेपर्यंत धक्का दिला. अर्धा किलोमीटरपर्यंत रुग्णवाहिकेला धक्का दिल्यानंतर नोबेल्स रुग्णालयातून दुसरी रुग्णवाहिका मागवण्यात आली. त्यानंतर त्यांना ममता रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच त्यांचा ईसीजी काढण्यात आला. मात्र, तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा – राष्ट्रवादीने लावले छत्रपती संभाजीनगर रोडचे दिशाफलक; सेना, मनसे, भाजपाला धोबीपछाड

सदोष रुग्णवाहिका सेवेत ठेवल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने सूर्यकांत देसाई यांना जीव गमावावा लागला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सूर्यकांत देसाई हे परळचे शिवसेनेचे माजी आमदार होते. १९९५ ते २००० या काळात ते परळ-लालबाग विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. २३ वर्षांपूर्वी ते डोंबिवलीत स्थायिक झाले. मृत्यूसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांच्याविषयी शोक व्यक्त केला. “देसाई हे शिवसेनेचे जुने नेते आणि आमदार होते. माझी कारकीर्द त्यांच्यामुळे घडली. रुग्णवाहिका बंद पडल्याने त्यांचा उपचारअभावी मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. यासंबंधीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून याची चौकशी व्हावी,” अशी मागणी यावेळी नांदगावकर यांनी केली.