घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रधक्कादायक! उपजिल्हा रुग्णालयात केसपेपरवर चक्क जातीचा कॉलम

धक्कादायक! उपजिल्हा रुग्णालयात केसपेपरवर चक्क जातीचा कॉलम

Subscribe

नाशिक : एक म्हण आहे की, जाता जात नाही ती जात.. आता तर जात पोहोचली थेट शासकीय रुग्णालयात. हा धक्कादायक प्रकार मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात घडत असल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रुग्णालयात उपचारासाठी काढण्यात येत असलेल्या केस पेपरवर जात असा कॉलम आहे. उपचार करण्या अगोदर हा कॉलम भरणे बंधनकारक असून हा कॉलम भरण्यासाठी डॉक्टर रुग्णांची जात विचारतात त्यानंतरच रुग्णावर उपचार केले जात असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

हा प्रकार संताप जनक आणि जातीपातीला खतपाणी घालणारा असून यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी व्यक्त करून तातडीने हा कॉलम रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा रिपाइंतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

मनमाड शहरासह ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजूंना स्वस्त दरात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने 2004 मध्ये 50 बेडचे उपजिल्हा रुग्णालय सुरु केले. येथे माता बालक संगोपन, शीशुजननी योजना, कुपोषित बालकांवर उपचार, पल्स पोलिओ मोहीम, नेत्र रुग्णांची तपासणी आणि उपचार, महिलांची प्रसुतीसाठी विशेष वॉर्ड, टीबी रुग्ण विशेष कक्ष असे विविध उपचार येथे केले जातात. सध्या खासगी हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधा गोरगरिबांच्या आवाक्या बाहेर गेल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली असून येथे रोज सर्व जाती धर्मांचे शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र आता या रुग्णांना जातीपातीचा सामना करावा लागत आहे.

केस पेपरवर 9 कॉलम असून त्यात जात म्हणून एक कॉलम आहे. केस पेपर काढल्यानंतर तो घेऊन डॉक्टरकडे गेल्यानंतर हा कॉलम भरण्यासाठी डॉक्टर रुग्णाला त्याची जात विचारतात. त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जातात. हा सर्व प्रकार धक्कादायक असून आरोग्य विभागाने हा कॉलम टाकून त्यांना काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत असून आता जात पाहून उपचार केले जाणार की काय? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात असून जातीपातीला खतपाणी घालणारा हा कॉलम तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी आता मनमाडकरांमध्ये जोर धरू लागली आहे.

मी उपचारासाठी माझ्या मुलीला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आलो होतो. येथे केस पेपर काढल्यानंतर मी मुलीला इंजेक्शन देण्यासाठी महिला डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी केस पेपर वरील कॉलम भरण्यासाठी माझी जात विचारली. मी ती सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या मुलीला इंजेक्शन दिले. मला प्रश्न पडला कि शासकीय हॉस्पिटलमध्ये जात का विचारली जात आहे? : कल्याण धीवर, रुग्ण नातेवाईक, मनमाड

या अगोदर खते घेताना शेतकर्‍यांना त्यांची जात विचारली जात होती. आता उपचारासाठी आलेल्या रुग्णांना त्यांची जात विचारली जात आहे. आता जात पाहून उपचार केले जाणार आहेत का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित करून हा कॉलम रद्द करण्यात यावा अन्यथा रिपाईतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. : गुरुकुमार निकाळे, तालुकाध्यक्ष, रिपाई युवा मनमाड

या जातीपातीचा काही संबंध नाही. काही विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये विशिष्ट आजार असतात. त्यावर उपचार करण्यासाठी हा कॉलम असून शासनाकडून आलेला हा फॉरमॅट असून आम्ही तो भरून घेतो. उपचार करताना आम्ही जात पाहत नाही. आमच्यासाठी आलेला प्रत्येक रुग्ण एक समान आहे. : डॉ. पवन राऊत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मनमाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -