प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलीला आईने संपवले, पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : तीन वर्षांच्या पोटच्या मुलीला अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातील खडकी परिसरात चार दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. मुलीच्या आईने आणि तिच्या प्रियकराने मुलीची हत्या केल्यानंतर कोणताही पुरावा मागे सोडला नाही. मात्र, गुन्हे शाखेने मुलीच्या अंगावरील शालेचा वापर करून या हत्येचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि या हत्येचा उलगडा करत आईसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पुण्यातील खडकी रेल्वे स्टेशनजवळील मोकळ्या जागेत गुरुवारी (२ मार्च) एका तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. गळा दाबून तिची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. कुठलाही पुरावा मागे नसल्याने या मुलीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते. मात्र, या चिमुरडीच्या अंगावर जी शाल होती त्यावरूनच पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि त्यांना यश मिळाले.

असे समजते की, महिलेचे पतीशी पटत नसल्याने ती तिच्या अकोला जिल्ह्यातील खिरपुरी गावात राहण्यास गेली होती. आरोपी संतोष देखील याच परीसरात राहत होता. दरम्यान या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही महिन्यांपूर्वी संतोष पुण्यात कामानिमित्त आला होता, तर सदर महिला आपल्या एका मुलीला घेऊन प्रियकराला भेटण्यासाठी पुण्यात पळून आली होती.

आरोपी महिलेला तीन मुली व एक मुलगा असून ती एकाच मुलीला घेऊन पुण्यात संतोषसोबत दापोडी परिसरात राहत होती. मात्र, ही मुलगी रात्री रडायची, याचा दोघांना त्रास व्हायला सुरूवात झाली. या त्रासामुळेच दोघांनी तीन वर्षीय निष्पाप मुलीची हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह खडकी रेल्वे स्टेशनजवळील निर्जन ठिकाणी फेकूनही दिला. कोणताही पुरावा मागे नसताना पोलिसांनी कौशल्याने तपास करत आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

पोलिसांनी मुलीच्या अंगावरील शालीला पुरावा बनवून एक पथक थेट अकोला खिरपूर गावात धाडले आणि मृत मुलीच्या घरी विचारपूस केली. तेव्हा तपासात पोलिसांना आरोपी महिला घरातून पळून गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह आढळलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्हीची तपासणी केली असता पोलिसांना एक जोडपं मृतदेह आढळलेल्या परिसरातून काही अंतरावर जात असल्याचे दिसले. या महिलेच्या अंगावर खडकी परिसरात येताना शाल होती, मात्र जाताना शाल नव्हती. त्यामुळे पोलिसांना या जोडप्यावर संशय आला. मात्र, हे जोडपे घर सोडून अज्ञात ठिकाणी राहत असल्याने पोलिसांना या जोडप्याला शोधण्य़ात अडथळे येत होते. बातमीदारामार्फत काही दिवसांनी पोलिसांना माहिती मिळाली की, हे जोडपं दापोडी येथील एका बांधकाम साईटवर लपून बसल्याचे समजले. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता या दोघांनी हत्येची कबुली दिली.

या तपासात गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, अंमलदार महेंद्र पवार, हरीश मोरे, अजय गायकवाड यांच्यासोबत पथकाने ही कामगिरी केली.