धक्कादायक! शाळकरी मुलीची साडेतीन हजारांत विक्री; लॉजवर नेऊन बलात्कार

ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा शहराला हादरुन सोडणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजारांत विक्री करुन एका महिलेने तिला अनोळखी व्यक्तीच्या हवाली केले.

संग्रहित छायाचित्र

Satara Crime: ऐतिहासिक वारसा असलेल्या सातारा शहराला हादरुन सोडणारी व माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, आठवीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजारांत विक्री करुन एका महिलेने तिला अनोळखी व्यक्तीच्या हवाली केले. ( Shocking Satara Crime Sale of school girl for three and a half thousand Rape taken to the lodge )

त्या नराधमाने मुलीला साताऱ्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार तब्बल नऊ दिवसानंतर उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित महिला व अनोळखी पुरुषावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी 13 वर्षांची असून, ती आठवी इयत्तेत शिकत आहे. भारती कट्टीमणी हिने पीडित मुलीला 28 एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसात वाजता बाहेरचे लोक येत आहेत. त्यांच्यासोबत फिरायला जायचे आहे, असं सांगितले. त्यामुळे मुलगी तिच्यासोबत फिरण्यासाठी गेली. त्यानंतर भारतीने तिला थेट सातऱ्यातील एका लॉजवर नेले. याठिकाणी अगोदरच तेथे एक अंदाजे 40 वर्षीय अनोळखी व्यक्ती होती. त्या व्यक्तीसोबत भारतीने व्यवहार ठरवला आणि त्याच्याकडून साडेतीन हजार रुपये घेऊन तिने मुलीची विक्री केली.

नराधमाच्या ताब्यात मुलीला देऊन भारती तेथून निघून गेली. संबंधित नराधमाने त्या शाळकरी मुलीवर लॉजच्या खोलीमध्ये बलात्कार केला. या प्रकारानंतर मुलगी रडू लागली. तेव्हा तिला दमदाटी करण्यात आली. घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने आईला मेसेज करुन सांगितली. त्यावेळी तिची आई बाहेरगावी होती. मेसेज पाहिल्यानंतर आईने मुलीला तत्काळ फोन केला. तेव्हा मुलगी रडू लागली. घडलेला घृणास्पद प्रकार मुलीने आईला रडत-रडत सांगितला. त्यानंतर आईने तातडीने साताऱ्याला येऊन तिच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिली.

( हेही वाचा: मे महिन्यातला उकाडा होणार कमी? हवामान विभाग सांगतो…)

मात्र, या प्रकाराची कोठे वाच्यता होऊ नये, यासाठी काहींचे प्रयत्न सुरु झाले. परंतु पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता नऊ दिवसांनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारती कट्टीमणी हिच्यासह त्या अनोळखी नराधमावर मुलीची विक्री करुन जबरदस्तीने बलात्कार करणे, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 372,376, 323,34 आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे अधिक तपास करत आहेत.