घरमहाराष्ट्रजागतिक मंदीत गणेशोत्सवाच्या खरेदीची धुंदी

जागतिक मंदीत गणेशोत्सवाच्या खरेदीची धुंदी

Subscribe

सध्या जागतिक मंदीचे वातावरण असून केंद्र सरकारने त्यावर उपाययोजना जारी केल्या असताना गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांमध्ये खेरदीचा जोरदार उत्साह दिसत होता. गोकुळाष्टमी संपताच नागरिकांनी गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली. गणेशोत्सवापूर्वीच्या शेवटच्या रविवारचा मुहुर्त साधत नागरिकांनी दादर, कॉफर्ड मार्केट, कुर्ला व ठाणे येथील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असतानाही खरेदीसाठी लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने लोकल गाड्यांमध्ये गर्दी झाली होती.

गणेशोत्सवापूर्वीच मुंबई व आसपासच्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये फुलांच्या आरास, विजेच्या माळा, मखर, तोरणे, पूजेचे साहित्य, गणपतीचे सोन्याचे दागिने, मोदक प्रसादाचे साहित्य, दुर्वा, केळीची पाने अशा साहित्याचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत. गोकुळाष्टमीची तयारी असल्याने या बाजारपेठांमध्ये नागरिकांची फारशी गर्दी दिसून येत नव्हती. परंतु गोकुळाष्टमी होताच व एका आठवड्याने गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी रविवारी खरेदीचा मुहूर्त साधला.

- Advertisement -

दादरमधील आयडीयलची गल्ली, रानडे रोडवर मखर, विजेच्या माळा, तोरणे, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी सकाळपासूनच गर्दी केली. रविवारी सकाळपासूनच मेगाब्लॉकचा सामना करत नागरिक दादरला पोहोचले. त्यातच रविवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे दुपारच्या वातावरणातील उष्मा अधिकच वाढला होता. डोक्यावर आलेल्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सायंकाळपर्यंत या गर्दीचा जोर आणखी वाढला. त्यामुळे दादर स्थानक ते कबुतरखान्यापर्यंत रस्ता जॅम झाला होता.

ठाण्यातही खरेदीचा उत्साह
दादरच्या बाजाराप्रमाणे ठाण्याच्या गोखले रोडवरही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. गोखले रोड, राममारुती रोड, ठाणे स्टेशन परिसर, स्टेशन रोड, जांभळी नाका या भागांमध्ये गणेशोत्सवाची आरास खरेदीची लगबग दिसत होती. इकोफ्रेंडली मखर, चायनीज फुले, कंठी, माला, पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -