घर महाराष्ट्र शंभर खाटांच्या शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची वानवा

शंभर खाटांच्या शहापूर उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची वानवा

Subscribe

राज्य सरकारने करोडो रुपये खर्च करुन बांधलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर ग्रामीण उपजिल्हा हॉस्पिटलची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या ठिकाणी पुरेसे तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने उपचारासाठी येणार्‍या आदिवासी गरीब रुग्णांना मुंबई किंवा ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये प्रसंगी खासगी दवाखान्यांची वाट धरावी लागत आहे.

शहापूरच्या येथील शासकीय हॉस्पिटलला उपजिल्हा हॉस्पिटलचा दर्जा देऊन येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका कराव्यात या अनेक वर्षांच्या नागरिकांच्या मागणीनंतर राज्य सरकारने १०० खाटांचे असे उपजिल्हा हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केले. मात्र, करोडो रुपये खर्च करुन बांधलेल्या या हॉस्पिटलची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डॉक्टरांच्या अभावामुळे ग्रामीण भागातून रोज येणार्‍या रुग्णांवर योग्य उपचार होत नाहीत. परिणामी उपचारासाठी आदिवासी रुग्णांना खासगी दवाखान्यात आणि ठाणे सिव्हील किंवा मुंबई येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवलं जात आहे. बालरोग तज्ज्ञ, फिजिशिअन सर्जन, वैद्यकीय अधीक्षक, भुलतज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ हे डॉक्टरच गेल्या अनेक वर्षांपासून येथे नाहीत. स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत; पण तेही कंत्राटी स्वरुपात कार्यरत असल्याची अवस्था या हॉस्पिटलमध्ये आहे.

- Advertisement -

तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. परिणामी नाईलाजास्तव गरीब रुग्णांना शहापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई येथील खासगी हॉस्पिटल किंवा दवाखान्यात उपचारासाठी जावे लागत आहे. या ठिकाणी आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. नवीन उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी १०० खाटांची सोय करण्यात आली आहे. तसेच या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची एकूण १५ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात अवघी ९ पदंच भरलेली आहेत. तर एकूण ६ पदे रिक्त आहेत.

वैद्यकीय अधीक्षक, वैद्य अधिकारी शस्त्रक्रिया, वैद्य अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्य अधिकारी भूलतज्ज्ञ, वैद्य अधिकारी भिषक, वैद्य अधिकारी बालरोग अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. सोनोग्राफी तज्ज्ञ हे पद देखील कंत्राटी पध्दतीने भरल्याने मंगळवार आणि बुधवार या दोनच दिवसात रुग्णांच्या सोनोग्राफी केल्या जातात. तर इतर दिवशी सोनोग्राफी सेवा बंद असल्याने जादा पैसे मोजून गरीब रुग्णांना खासगी सेंटरमध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागत आहे. उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशीन आहेत; पण रेडिओलॉजिस्ट हे पदच येथे भरले नसल्याने सिटी स्कॅनसाठी रुग्ण आल्यास क्ष-किरण तंत्रज्ञाला ही सिटीस्कॅन मशीन हाताळावी लागत आहे, असे उपजिल्हा हॉस्पिटलमधूनच सांगण्यात येत आहे. डॉक्टरांअभावी ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार होत नसल्याची गंभीर समस्या या ठिकाणी गेली अनेक वर्षे आहे. असे असतानाही शहापूर तालुक्यातील विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, समाजसेवक याबाबत सरकारकडे तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे पाहायला मिळाले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -