“संजय राऊत नाशकात येऊनच दाखवा” शिंदेंच्या युवासैनिकांचा गंभीर इशारा

नाशिक : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्याबाबत राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता, त्याच वक्तव्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटताना दिसून येत आहेत. रविवारी (दी.१९) रात्री उशिरा त्यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सोमवारी (दी.२०) दुपारी युवा सेनेने त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत नाशिकमध्ये येऊनच दाखवा असा इशारा देखील दिला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होत. त्याचे तीव्र पडसाद आता नाशिक शहरात उमटताना दिसून येत आहेत. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या विरोधात अशा हीन दर्जाचं अपमान जनक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, नाशिकच्या द्वारका चौक परिसरात शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सैनिकांनी एकत्र येत संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं. तसेच, त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. “संजय राऊत मुर्दाबाद, संजय राऊतचा धिक्कार असो” अशा पद्धतीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, संजय राऊत यांना नाशिक जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही जर ते नाशिक मध्ये आलेच तर त्यांना जोडे मारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी युवा सैनिकांनी दिला.

दरम्यान, यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, योगेश बेलदार, उमेश चव्हाण, राहुल वारुळे, अस्मिता देशमाने, किरण राक्षे, मयूर तेजाळे, विकास पात्रे, श्रावण पवार, महेंद्र वाघमारे, निलेश वाकळे, आदींसह युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते