Shraddha Walker Murder : एंटरटेन्मेन्ट मीडियाचा प्रभाव बनते गुन्हेगाराचे माध्यम?

मुंबई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने पूर्ण देश हादरला. वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची 18 मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे दिल्लीतील जंगलात फेकल्याची कबुली तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी अशा घटनांबाबत इंटरनेटकडे अंगुलीनिर्देश केले आहे. विशेष म्हणजे, एका अमेरिकन वेब-सीरिज पाहूनच आफताबने हा कट रचल्याचे समोर आले आहे.

कोंबडी आधी की अंडे आधी? या प्रश्नाप्रमाणेच मनोरंजन माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो की, समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब मनोरंजन माध्यमात उमटते, हा वादही तसा जुनाच आहे. ऑगस्ट 2001मध्ये मुंबईतील गोरेगाव येथे पूनम प्लास्टिक या फॅक्टरीच्या मालक आणि अन्य सात जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी मुख्य आरोपी अमरजीत सिंग ऊर्फ सूरज याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. सूरज हा एका मुलीच्या प्रेमात पडला होता. त्याला पगार कमी असल्याने तिच्या भावाने त्याला विरोध केला होता. त्यातून हे हत्याकांड घडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. कारण त्याने मालकाकडून एका ब्लॅन्क चेकवर सही करून घेतली होती. तसेच, त्यावेळी त्याने आपल्या कृत्याचे समर्थन करताना लोकप्रिय झालेल्या ‘गदर’ चित्रपटाचे उदाहरण दिले होते, असे सांगितले जाते.

त्यानंतर काही चित्रपट, ‘क्राइम पेट्रोल’सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दाखवलेल्या घटनांप्रमाणे काही गुन्हे घडल्याचे अनेकदा समोर आले आहे. श्रद्धा आणि आफताब प्रकरणातही असाच प्रकार होता. ‘डेक्स्टर’ ही अमेरिकन क्राइम थ्रिलर बेव सीरिज पाहून आफताबने श्रद्धाच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी देखील शनिवारी एका कार्यक्रमात याच आशयाचे वक्तव्य केले आहे. ‘तुम्ही आताच वृत्तपत्रांमध्ये काही वाचले आहे. मुंबईत प्रेम आणि दिल्लीत हिंसा (श्रद्धा वालकर प्रकरण) इंटरनेटवरील सामग्रीपर्यंत अगदी सहजपणे पोहचता येत असल्याने अशा प्रकारचे गु्न्हे घडत आहेत,’ असे मत त्यांनी नोंदवले आहे. (वेब-सीरिज या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात.) त्यामुळे मनोरंजनाच्या विविध प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणाऱ्या काही कार्यक्रमांतील दृश्य म्हणजे समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब असते, असे सांगितले जात असले तरी, एखाद्या गाव, शहर, फार-फार तर राज्यापर्यंत मर्यादित असलेली घटना संपूर्ण जगासमोर येते आणि एखादी विकृत मानसिकता त्याचे अनुकरण करते, हे वास्तव नाकारता येणार नाही.