मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गेली अडीच वर्ष राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री ठरलेले एकनाथ शिंदे भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे महायुतीचे समन्वयक म्हणून काम पाहतील आणि उपमुख्यमंत्रिपद खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Shrikant Shinde name is being discussed after Eknath Shinde refused the post of Deputy Chief Minister)
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? आणि नव्या मंत्रिमंडळात महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला नेमकी किती खाती मिळणार? यावर आज दिल्लीत भाजपा नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खल होताना दिसत आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले असताना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायचे की नाही, या संभ्रमात एकनाथ शिंदे असल्याचे समजते. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत झालेल्या बैठकीत याबाबत स्पष्टता देण्यात आली.
हेही वाचा – Ajit Pawar : ‘CM’पद वाटून घेणार का? प्रश्न विचारल्यावर अजितदादांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “ए एक भाकरी…”
भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहसा उपमुख्यमंत्रिपद दिले जात नाही. 2014 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये तेव्हाच्या एकसंध शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद नाकारले होते. मात्र, आता महायुतीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन गट सहभागी असल्याने या दोन्ही गटाला उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, सरकारच्या या रचनेत एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याबाबत उत्सुकता आहे. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर ‘उप’ मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेण्याऐवजी पक्षातूनच अन्य नेत्याला संधी देण्याबाबत शिंदे यांचा विचार सुरू असल्याचे कळते. याला दुजोरा देतानाच, एकनाथ शिंदे हे राज्याच्या नव्या सरकारमध्ये कदाचित उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत, अशी माहिती शिंदे यांचे निकटवर्तीय आमदार संजय शिरसाट यांनी आज दिली. असे असले तरी त्याबदल्यात शिवसेनेकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा अशा तीन विभागांची महत्त्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
2 डिसेंबरला नव्या सरकराचा शपथविधी?
दरम्यान, येत्या 2 डिसेंबरला महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. परंतु संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरूण चेहऱ्यांना संधी देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे कळते. मुख्यमंत्रिपदासोबत गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. तर गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, डॉ. विजयकुमार गावित यांच्यासारख्या बड्या नेत्यांबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली जाऊ शकते. मात्र याबाबत भाजपाकडून कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नाही.
हेही वाचा – Maharashtra Politics : मनसेला सोबत घेण्यासंदर्भात आमच्या पक्षात…; काय म्हणाले अंबादास दानवे?