मुंबई : महाराष्ट्रात तुळजाभवानी मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिर या ठिकाणी काही वर्षांपासून ड्रेसकोड लागू करण्यात आलेला आहे. अशातच आता मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्यात आलेला आहे. एकिकडे या ड्रेसकोडच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे तर, दुसरीकडे काहीजण या निर्णयाला विरोध करत आहेत. असाच विरोध वकील गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने केला आहे. सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू केल्याने मंदिर प्रशासनाची राष्ट्रीय महिला आयोगात झेन हिने तक्रार दाखल केली आहे. (Siddhivinayak temple Sadavarte daughter opposes dress code in Siddhivinayak temple Complaint filed with National Commission for Women)
झेनच्या तक्रारात काय?
“मी झेन सदावर्ते 12 वीत शिकत असून नॅशनल ब्रेवरी अवार्डची विजेती आहे. सिद्धिविनायक मंदिरात महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भक्तांवर लादण्यात आलेला हा ड्रेस कोड सामाजिकदृष्ट्या चुकीचा आणि भेदभाव करणारा आहे, असं माझं मत आहे. सिद्धिविनायक मंदिरात लागू करण्यात आलेला ड्रेस कोड मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असलेल्या देशात सर्व नागरिकांना त्यांच्या श्रद्धांचे पालन करण्याची परवानगी असणे, आवश्यक आहे. कपडे घालण्यावरुन सार्वजनिक, धार्मिक ठिकाणी भेदभाव करणे चुकीचे आहे. भक्तांनी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा का घालाव्यात? श्रद्धेचा गाभा भक्तीमध्ये आहे परिधान केलेल्या कपड्यात नाही. मी नम्रपणे विनंती करते की, ड्रेस कोडच्या नियमांचा पुन्हा एकदा विचार करण्यात यावा. मंदिर प्रशासनाने भेदभाव करणाऱ्या या नियमांबाबत सुधारणा केली पाहिजे”, असे झेन सदावर्ते हिने आपल्या तक्रारीत लिहिले आहे.
सिद्धिविनायक मंदिरातील ड्रेसकोडचा नियम काय?
ड्रेसकोड संदर्भातलं सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. सिद्धिविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली आहे.
सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. यापुढे समोरच्याला संकोच वाटेल, असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी, असे ट्रस्टकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मंदिरात येणाऱ्या लोकांना इतर लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल असे कपडे घालून येण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे, असेही ट्रस्टच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – Siddhivinayak Temple Dress Code : भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा, सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड