जनतेनं अक्कल असणाऱ्यांकडे बँकेची जबाबदारी दिली, नारायण राणेंची महाविकास आघाडीवर टीका

सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. सिंधुदुर्गातील देवता आणि जनेतेच्या आशीर्वादामुळे ही निवडणूक जिंकलो असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. तसेच जनेतेन अक्कल असणाऱ्यांकडे सिंधुदुर्ग मध्यवर्ती बँकेची जबाबदारी दिली असल्याचा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये माजी सत्ता नाही तर भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देव देवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. तसेच भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि आमदार नितेश राणे यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हा विजय मिळवला आहे. निलेश राणे आणि जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी चांगली साथ दिली होती. बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी अक्कलेचा वापर झाला होता आणि ज्यांच्याकडे अक्कल आहे त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेनं बँक दिली असल्याचे नारायण राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक जिंकण्यामध्ये भाजप नेते निलेश राणे आणि सर्व कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत आहे. त्यामुळे याचे सर्व श्रेय नितेश राणे, निलेश राणे, महिला कार्यकर्ता आणि जिल्हा अध्यक्षांना  जाते. सिंधुदुर्गाचा विजय म्हणजे जिल्ह्यातील सर्व देव देवतांचा विजय झाला आहे. यानंतर आता पुढील निवडणुकांकडे पाहणार असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत.

विधानसभा आणि लोकसभेचा प्रतिनिधी भाजपचाच

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली आहे. आता लक्ष महाराष्ट्र आहे. आगामी निवडणुकांमध्ये ज्या काही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा भाजपचाच विजय होईल. सिंधुदुर्गातील लोकांना तेच तेच तेच तेच चेहरे पाहवत नाही आहेत. त्यामुळे अशा लोकांना जनता लोकप्रतिनिधी म्हणून ठेवणार नाहीत असेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील विजयानंतर गायब असलेल्या नितेश राणेंच्या फेसबुक पोस्टनं खळबळ; ‘गाडलाच’ फोटो व्हायरल