सिंधुदुर्ग : देशभरात रविवारी (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदुर्ग नगरी मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. “सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक सेवा करणार आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास हाच माझा ध्यास असून जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी सदैव तत्पर असून राज्य शासन कटिबद्ध आहे.” अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. (Sindhudurg flag hoisting by Guardian Minister Nitesh Rane)
हेही वाचा : Praniti Shinde : देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना आणि मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम, लोकशाही तसेच प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्य घटनेचा स्विकार करुन 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे.” असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले. या करारांमुळे कोकणात विशेषतः सिंधुदुर्गमध्येदेखील अनेक प्रकल्प निर्माण होणार असून त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.” असे ते म्हणाले. “राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु तसेच मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत.” असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
सिंधुदुर्गमधील शासकीय मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री नितेश राणे यानी जनतेला संबोधित केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, आमदार निलेश राणे, जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सह प्रमुख नेते पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते. ते यावेळी म्हणाले की, “औद्योगिक विकास लक्षात घेता राज्यातील लघु आणि मध्यवर्ती बंदराच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबर विजयदुर्ग बंदर विकसित करणार, असे अनेक अभिनव प्रकल्प आम्ही राबवणार आहोत. सर्वच प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी ड्रोन सिस्टीमद्वारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मासेमारीला प्रतिबंध बसणार आहे. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी अद्यावत अशा 100 स्टील गस्ती नौका मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार आहोत” असे ते यावेळी म्हणाले.