तेजस्वी काळसेकर, सिंधुदुर्ग : : राज्यभरात खून, दरोडे, बलात्कार, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे 47 गुन्हे दाखल असलेल्या 27 वर्षीय अहिल्यानगर जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगार आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसलेला सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली. मोका लागलेला हा गुन्हेगार राज्यातील पोलीस दलाच्या रडारवर होता. कणकवली येथे 19 डिसेंबरला 3 लाख 26 हजार दागिन्यांच्या चोरी प्रकरणात त्याचे सीसीटीव्ही फुटेज तसेच त्याची दुचाकी या पुराव्यांच्या आधारे या गुन्हेगाराला सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात अन्य दोन नातेवाईक साथीदारांचा समावेश असून त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. (Sindhudurg Police arrested criminal accused in 47 cases)
हेही वाचा : Nana Patole : परभणी अन् बीड प्रकरणावरून पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, चौकशीतून…
आटल्या उर्फ अतुल ईश्वर भोसलेवर राज्यात अनेक ठिकाणी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामुळे राज्यातील पोलीस त्याचा बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते. कणकवली येथील दागिने चोरीचे प्रकरण घडताच तात्काळ कणकवली पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी संयुक्तपणे शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंटच्या आधारे सिंधुदुर्ग पोलिसांनी अहिल्यानगर कर्जत भागात त्याला ताब्यात घेतले. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ मध्ये घडलेल्या एका गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का? याची पडताळणी पोलीस करत आहेत. तर फोंडाघाट येथील प्रकरणात त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. कणकवली दागिने चोरी प्रकरणातीलही त्याने गुन्हा कबूल केला. जिल्ह्यातील अन्य गुन्ह्याप्रमाणे राज्यातील अन्य गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्यामुळे या जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याला राज्यामधील अन्य पोलीस ठाण्याकडे वर्ग केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
कणकवली आणि फोंडाघाट येथील गुन्ह्यामध्ये असलेले फिंगर प्रिंट आरोपीच्या फिंगरप्रिंटची मिळते जुळते आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजवर त्याची ओळख पटवण्यात आली आहे. राज्यात अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा हात असून तब्बल 47 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. अनेक जिल्ह्यामधील हत्या, सरकारी कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, बलात्कार, दरोडा, चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत, अशी महिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. राज्यभर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असे गुन्हेगार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे धाडस करू नये, म्हणून जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा गुन्हेगारांची माहिती शोधून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.