सीताराम कुंटे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे, नवा मुख्य सचिव कोण ?

Upper Chief Secretary Sitaram Kunte's chamber has changed

मुख्य सचिव सीताराम कुंटे हे येत्या ३० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असून त्यांना तीन महिने मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राला पाठवण्यात आला आहे. कुंटे यांच्या तीन महिन्याच्या मुदतवाढीचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळणे अपेक्षित असून याबाबतचा अंतिम निर्णय आठवडाभरात होईल. सीताराम कुंटे हे १९८५ च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. सीताराम कुंटे यांनी राज्यात आणि मुंबईत कोरोनाचे संकट असताना चोख कामगिरी बजावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक असे सीताराम कुंटे आहेत. सीताराम कुंटे यांनी मुख्य सचिवपदी जबाबदारी स्विकारण्याआधी संजय कुमार यांच्याकडे राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी होती. आता कुंटे यांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने येत्या काही दिवसात राज्याला महिला मुख्य सचिव मिळणार की ठाकरे सरकार आपल्या पसंतीचा अधिकारी याठिकाणी नेमणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजोय मेहता यांनाही यापूर्वी दोनवेळा मुख्य सचिव पदी मुदतवाढ देण्यात आली होती. अजोय मेहता यांना एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ तर दुसऱ्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मे २०२० पर्यंत अजोय मेहता हे मुख्य सचिव होते. त्यानंतर जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत संजय कुमार हे मुख्य सचिव होते. तर सीताराम कुंटे हे मार्च २०२१ पासून मुख्य सचिव आहेत. अजोय मेहतांना यांना दोनवेळा मिळालेला मुदतवाढीचा पायंडा कायम ठेवत आता सीताराम कुंटे यांनाही तीन महिन्यांची मुदतवाढ मिळेल असे खात्रीलायकरीत्या समजते. सीताराम कुंटे हे महिन्याच्या शेवटी म्हणजे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच राज्य सरकारच्या विविध विभागात त्यांचा अनुभव पाहता, तसेच मुख्य सचिवपदी त्यांनी सांभाळलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने तीन महिन्याची मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रकडे पाठवला आहे.

राज्याने प्रत्येक पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकार संमत करेल असे नाही. त्यामुळे केंद्राने प्रस्ताव संमत केला नाही तर कोणाची वर्णी लागणार हेदेखील महत्वाचे ठरणार आहे. सध्या सीताराम कुंटे यांना महाराष्ट्र भाजपचा असलेला विरोध पाहता येत्या काळात कोणाची वर्णी केंद्राकडून लागणार हे लवकरच स्पष्ट होईल. तसेच कुंटे यांच्या मुदतवाढीस राज्यातील आयएसएस कॅडरकडून विरोध होत असल्याने आता सर्वस्वी नेमणूक ही पंतप्रधान कार्यालयाच्या अखत्यारीत असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला शिफारशीसाठीच्या प्रस्तावासोबतच नव्या मुख्य सचिवांच्या पर्यायाची नावेही केंद्राकडे पाठवावी लागणार आहेत. वंदना कृष्णा, देबाशिष चक्रवर्ती की मनुकुमार श्रीवास्तव या तिघांपैकी नक्की कोणाची वर्णी लागणार हे येत्या काही दिवसातच केंद्राच्या निर्णयाने स्परष्ट होईल.

मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार ?

मुख्य सचिवपदी असलेले सीताराम कुंटे यांच्यानंतर वंदना कृष्णा या १९८५ च्या बॅचच्या सनदी अधिकारी सेवा जेष्ठतेनुसार प्रशासनात अग्रेसर आहेत. मात्र वंदना कृष्णा या फेब्रुवारी २०२२ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने केवळ तीन महिन्यांसाठी मुख्य सचिव नेमण्याचा कल राज्य सरकारचा नाही. याआधी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांमध्ये चंद्रा अय्यंगार आणि मेधा गाडगीळ यादेखील मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होत्या. पण दोघांपैकी कोणाचीही या पदावर नेमणूक झाली नाही.

मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर देबाशीष चक्रवर्ती आहेत. तेदेखील १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. पण चक्रवर्तींच्या नावाची शिफारस मुख्य सचिवपदी होण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांचा कार्यकाळही फेब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. कुंटे यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच अवघ्या तीन महिन्यातच ते सेवानिवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या सनदी अधिकाऱ्यांच्या सेवेचा कमी कालावधी असेल तर, अशा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्या पसंतीचा अधिकारी या पदावर नियुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

तीन सनदी अधिकाऱ्यांमधील स्पर्धा

वंदना कृष्णा आणि देबाशिष चक्रवर्ती यांच्यानंतर वरिष्ठ असलेले १९८६ च्या बॅचचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनुकुमार श्रीवास्तव यांचा क्रमांक मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत सर्वात वर आहे. त्यांच्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या १९८७ च्या बॅचच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे मनुकुमार श्रीवास्तव आणि सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदासाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.