भाजपच्या व्यासपीठावर चक्क शिवसेनेची नगरसेविका

विशेष म्हणजे या नगरसेविकेने गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून व्यासपीठावर प्रवेश केला. भाजप कार्यालयाची तोडफोड करणार्‍या शिवसैनिकाची ही नगरसेविका पत्नी आहे.

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीतील वाद विकोपाला गेलेला असताना शिवसेनेच्या एका नगरसेविकेने थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर विराजमान होत जणू भाजप पदाधिकार्‍यांना आव्हान दिले. विशेष म्हणजे या नगरसेविकेने गळ्यात शिवसेनेचे मफलर घालून व्यासपीठावर प्रवेश केला. भाजप कार्यालयाची तोडफोड करणार्‍या शिवसैनिकाची ही नगरसेविका पत्नी आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्यातील वाद शिव्यांपर्यंत गेला आहे. या वादामुळे सध्या शिवसेना आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांत कमालीची खुन्नस दिसते. या दोघा कार्यकर्त्यांतून विस्तवही जाऊ शकत नाही, असे बोलले जाते. परंतु गेल्या सोमवारी (दि. २१) देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतील एका कार्यक्रमात धक्कादायक प्रकार घडला. या प्रकाराबाबत माध्यमांपर्यंत माहिती पोहचणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. झाले असे की, पाथर्डी फाटा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते होते. या कार्यक्रमानिमित्त भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. फडणवीस यांचा कार्यक्रम स्थळी प्रवेश होताच व्यासपीठावर शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे-दराडे अचानकपणे अवतरल्या. त्यांनी गळ्यात शिवसेनेचे चिन्ह असलेले मफलर घातले होते. आजूबाजूला भाजपचे पदाधिकारी आपल्या पक्षाचे मफलर घालून विराजमान झाले होते. दोन्ही मफलरवर केशरी रंग असल्याने शिवसेनेच्या नगरसेविकेकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. परंतु काही वेळात एका भाजप पदाधिकार्‍याच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. संबंधित नगरसेविकेच्या बाजूलाच बॉडी गार्ड उभे करुन काही अनुचीत घडू नये म्हणून सुरक्षीततेची व्यवस्था केली. तसेच भाजप महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनीही या नगरसेविकेच्या पाठीमागे उभे राहून ‘वॉच’ ठेवला.

भाजप पदाधिकार्‍यांच्या नाकावर टिच्चून व्यासपीठावर विराजमान होणार्‍या या नगरसेविकेने ‘भाजपेयींना’ काही वेळासाठी चांगलाच घाम काढला होता. महत्वाचे म्हणजे किरण गामणे- दराडे या भाजप कार्यालयावर दगडफेक करणारे बाळा दराडे यांच्या पत्नी आहेत.