शिवसेनेचे ६ आमदार नॉट रिचेबल, मुख्यमंत्र्यांची पुन्हा महत्त्वाची बैठक

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. त्यांनी एक मोठा गट आपल्या पाठी उभा केला आहे. जवळपास ४० हून अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आज पुन्हा एकदा शिवसेनेचे सहा आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दादा भुसे, दीपक केसरकर, संजय राठोड आणि दिलीप लांडे यांच्याशी संपर्क झालेला नाहीये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचे फोन नॉट रिचेबल लागत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा मुंबईत आमदारांची सकाळी ११.३० वाजता बैठक घेणार आहे. तसेच शिवसेनेच्या नाराजीनाट्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आज महत्त्वाची बैठक घेणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांना समोर येण्याचं आवाहन केलं आणि तुम्ही सांगाल तर मुख्यमंत्रिपद सोडून देईन असा विश्वास दिला. तर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच्या सर्व आमदारांची बैठक घेतली आणि तीव्र विरोध केला होता. मात्र, त्यांनी ट्विट करत हिंदुत्त्व फॉरएव्हर अशा आशयाचं ट्वीट केलं होतं.

दरम्यान, एकनाथ शिंदे आज भाजपच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार आहेत. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. या सहा आमदारांनानंतर अजून दहा आमदार गुहावाटीत दाखल होणार आहेत.


हेही वाचा : शिवसेनेचे सरवणकर, कुडाळकर एकनाथ शिंदेंच्या गटात, शिंदेंकडे 44 आमदार