घरमहाराष्ट्र‘एसटी’कडून मिळणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’मुळे बोगस ज्येष्ठांना चाप

‘एसटी’कडून मिळणाऱ्या ‘स्मार्ट कार्ड’मुळे बोगस ज्येष्ठांना चाप

Subscribe

प्रवासादरम्य़ान पैसे बाळगण्याचीही गरज प्रवाशांना राहणार नाही कारण या स्मार्ट कार्डला रिचार्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध

राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला असून सर्वच आगारात ‘स्मार्ट कार्ड’ नोंदणीच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. पुर्वी एसटी बसने प्रवास करताना जेष्ठ मंडळींना मतदान कार्ड, आधारकार्ड सोबत बाळगावे लागत होते, मात्र आता त्यापासून आता सुटका होणार आहे. सुरक्षित प्रवास म्हणून अनेक प्रवासी बसने प्रवास करण्याला पसंती देत असतात या प्रवासादरम्य़ान पैसे बाळगण्याचीही गरज प्रवाशांना राहणार नाही कारण या स्मार्ट कार्डला रिचार्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फक्त ५५ रुपये शुल्क भरणे आवश्यक

बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता कागदी पासऐवजी महामंडळाकडून बँक व आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक ‘स्मार्ट कार्ड’ आपल्या जवळील बस आगारातील पास तसेच आरक्षण केंद्रात देण्यात येत आहे. हे कार्ड घेण्यासाठी ५५ रूपये शुल्क प्रवाशांकडून घेतले जात आहे. या स्मार्ट कार्डचे वितरण एसटीच्या वर्धापन दिन म्हणजेच १ जून २०१९ पासून सुरू करण्यात आल्याचे कल्याण एसटी आगारातर्फे सांगण्यात आले.

- Advertisement -

आता कागदी पास देण्याऐवजी अत्याधुनिक स्मार्टकार्ड

सध्याच्या २१ व्या शतकात तसेच ‘डिजिटलायझेशन’ युगात वावरत असताना एसटी महामंडळ प्रशासनाने पुर्वी सारखे कागदी पास देण्याऐवजी अत्याधुनिक स्मार्टकार्ड देण्यास सुरूवात केली आहे. या स्मार्ट कार्डवर पासधारकाचे नाव, सवलतीचा तसेच बसचा प्रकार, प्रवासाचे अंतर, प्रवास सवलतीची मुदत अशास्वरूपाची माहिती नमूद असणार आहे. हे कार्ड संबंधित सवलतधारकाच्या आधार क्रमांकाशी जोडले असल्याने खरं वय समजणे सोपे होईल. प्रवास करताना या कार्डाशिवाय इतर कोणतीही कागदपत्रे दाखविण्याची गरज त्यांना भासणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून या स्मार्ट कार्ड सुविधेचा लाभ घ्यावा

राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करताना ज्येष्ठ प्रवाशांना तिकिटाच्या दरात सवलत असल्याने शहरी, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक प्रवाशांचा बसद्वारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. तसेच कल्याण आगारात जेष्ठ नागरिकांना स्मार्टकार्ड देण्याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर संधीचा जेष्ठ नागरिक प्रवाशांनी लाभ घ्यावा. 

–  तुकाराम साळुंखे, कल्याण आगार स्थानक प्रमुख 

सविस्तर माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध

कल्याण आगाराचे वाहतूक नियंत्रक प्रकाश शिनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट कार्डची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्याला आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असून त्यानंतर १० ते १५ दिवसात जेष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ आगारातर्फे यादी जाहीर करून देण्यात येत आहे. या स्मार्ट कार्डमुळे ज्येष्ठ नागरिकांनी कुठे आणि किती किलोमीटरचा प्रवास केला? याची सविस्तर माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होण्यास मदत होईल. यापूर्वी ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकीटाच्या दरावर ४ हजार किलोमीटर प्रवासाचीच मर्यादा होती. मात्र, केवळ मतदान कार्ड, आधार कार्ड पाहून प्रवाशांना तिकिटे दिली जात असल्याने कोणत्या प्रवाशाने किती प्रवास केला, याची माहिती महामंडळाला मिळवता येत नव्हती, मात्र या नवीन कार्डमुळे ते शक्य होणार आहे.

- Advertisement -

महामंडळाचे आर्थिक नुकसानाला आळा घालणे शक्य

दरम्यान, बनावट कागदपत्रे दाखवून ६० वयवर्ष पुर्ण झाले असे सांगणारे बसप्रवास करणारे अनेक प्रवासी असतात. अनेकांवर यापूर्वी कारवाई देखील झाली होती. मात्र आता या स्मार्ट कार्ड योजना लागू केल्याने बस प्रवासादरम्यान होणारी फसवेगिरी आणि त्यामुळे होणाऱ्या महामंडळाचे आर्थिक नुकसानाला आळा घालता येणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -