घरनवी मुंबईस्मार्टसिटी नवी मुंबई असुरक्षित, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची कबुली

स्मार्टसिटी नवी मुंबई असुरक्षित, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची कबुली

Subscribe

नवी मुंबई : स्मार्टसिटी म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई शहराने अनेक पुरस्कार मिळविले आहेत. मात्र वाढत्या गुन्ह्यांचा आलेख पाहता नवी मुंबईच्या सुरक्षेच्या बाबतीत मात्र चिंताजनक स्थिती आहे. सोनसाखळी चोरी, सायबर गुन्हे, बिल्डरांकडून फसवणूक आणि महिलांचा मानसिक छळ व बलात्कार, पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात मागील वर्षात वाढ झाली आहे. नवी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वत: याची कबुली दिली आहे. येत्या काळात पोलीस दलात खांदेपालट करणार असल्याचे सांगत आयुक्त भारंबे यांनी बेशिस्त आणि कामात चालढकल करणार्‍या कर्मचार्‍यांची हयगय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज, शुक्रवारी सन 2022मधील गुन्हे व तपासकामांचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी महेश घुर्ये (अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे), अमित काळे (पोलीस उपआयुक्त, गुन्हे), तिरुपती काकडे (पोलीस उपआयुक्त, वाहतूक), प्रशांत मोहिते (पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा), परिमंडळ-1चे उपआयुक्त विवेक पानसरे आदी अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

या गुन्हेगारी अहवालानुसार 2021मध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, खंडणी, दंगल, बलात्कार आणि विनयभंग अशा 14 प्रकारचे 6642 गुन्हे घडले होते. तर त्यातील 4965 गुन्हे (75 टक्के) उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले होते. 2022 मध्ये 6443 गुन्हे घडले होते. यापैकी 4267 (67 टक्के) गुन्हांचा छडा लागला आहे.

प्रत्येक ठाण्यात सायबर सेल सुरू करणार
नवी मुंबईत सर्व प्रकारच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. आगामी कालावधीत यावर नियंत्रण मिळविण्यावर माझा भर राहील. सायबर गुन्हयांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेल सुरू केले जातील. तसेच महिलांविषयक गुन्हे रोखणे व पॉस्कोच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलले जातील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची नवीन टीम तयार करण्यात येईल, असे आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

- Advertisement -

बेशिस्त कर्मचार्‍यांना शिस्तीचे देणार धडे
नवी मुंबई पोलीस दलात अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांकडून तक्रार दाखल करून न घेणे, पेट्रोलिंग पथकाकडून पैशांची मागणी करणे, पोलीस ठाण्यापेक्षा इतर मार्गाने गुन्ह्यांचा निपटारा करणे, कामचुकारपणा या प्रकारात नव्या व जुन्या कर्मचार्‍यांमध्ये वाढ झाल्याबाबत आयुक्त भारंबे यांचे लक्ष वेधले. त्यावर, बेशिस्त अधिकारी व कर्मचार्‍यांना आगामी कालावधीत शिस्तीचे धडे देण्यात येणार असून त्यानंतरही असे प्रकार सुरू राहिले तर घरचा आहेर देणार असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांविषयक गुन्ह्यांत लक्षणीय वाढ
सन 2022मध्ये महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढल्याचे चित्र आहे. 2021मध्ये बलात्कार, अपहरण, विनयभंग, छेडछाड, छळ, खून, आत्महत्या, इतर कारणांमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या 928 गुन्हे घडले होते. तर 2022मध्ये असे 1036 गुन्हे घडले आहेत. 2021मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या 105 घटना होत्या, त्या 2022ला 131वर पोहचल्या असून बलात्काराच्या प्रकरणात 23ने वाढ झाली आहे.

सायबर गुन्ह्यांची डोकेदुखी
मुंबई, ठाणे, पनवेल, उरणला जोडणार्‍या नवी मुंबई शहरात सायबर गुन्हे ही पोलिसांची डोकदुखी ठरत चालली आहे. यंदा दाखल 207 गुन्ह्यांपैकी 51 गुन्हे उजेडात आले आहे. तर मागील वर्षी अवघे 41 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

मालमत्ता वसुली 21 टक्क्यांवर
मालमत्ताविषयक गुन्हे नियंत्रणासाठी आगामी कालावधीत नवी मुंबई पोलिसांना धाडसी पावले उचणे आवश्यक आहे. 2021मध्ये 2265 गुन्ह्यांची नोंद तर 1024 गुन्ह्यांची उकल झाली होती. 2022मध्ये त्यात वाढ होत 2447 गुन्ह्यांची नोंद तर अवघ्या 814 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. 2021मध्ये 25.78 कोटी मालमत्तेची चोरी झाली होती. त्यापैकी 6.66 कोटींची वसुली (रिकव्हरी) झाली. तर 2022मध्ये 30.25 कोटींच्या चोरीपैकी 8.66 कोटींची वसुली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -