घरमहाराष्ट्र...म्हणून अजित पवार गेले फडणवीसांकडे; शरद पवारांचा गौप्यस्फोट

…म्हणून अजित पवार गेले फडणवीसांकडे; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गौप्यस्फोट

मुंबईतील नेहरू सेंटरमधील बैठकीत माझे काँग्रेस पक्षातील काही जणांशी तीव्र मतभेद झाले होते. सत्तास्थापनेच्या कारणावरून नाहीतर यासाठी अन्य काही विषय याला कारणीभूत होते. या वादानंतर मी या ठिकाणी बसण्यात काहीच अर्थ नाही या निकषावर आलो होतो. एवढेच नाहीतर या वादावादीतच मी त्या बैठकीतूनही बाहेर पडलो होतो. त्यावेळी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील आदींची उपस्थिती होती. या सर्वांच्या समोरच ती वादावादी झाली होती.

मी निघून गेल्यावर मला कळाले की, अजित पवार यांनी आमच्या सहकार्‍यांजवळ काँग्रेसबद्दलची नाराजी व्यक्त केली. जर आताच हे (काँग्रेस) अशाप्रकारची टोकाची भूमिका घ्यायला लागले तर उद्या सरकार तरी कसे चालणार? काँग्रेसची भूमिका योग्य नाही. म्हणून यामध्ये सहभागी होण्याबाबतीत माझा तीव्र आक्षेप आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि निर्णय घेतला,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा, या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितली.

- Advertisement -

अजितदादा भाजपसोबत गेल्याच्या घडामोडींना पार्श्वभूमी आहे, असे सांगत शरद पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि भाजपामधील काहीजणांना वाटत होते की, आमच्याशी बोलावे. दिल्लीवाल्यांना देखील आमच्याशी बोलावे असे वाटत होते. निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि काहीजणांशी आमचे चांगले संबंध होते. या संबंधाच्या पार्श्वभूमीवरच देवेंद्र फडणवीस यांनी काही बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे, मी जाऊ का? असे अजित पवार यांनी मला विचारले होते.

यावर मी अजित पवार यांना राजकारणात संवाद ठेवला पाहिजे, असे म्हणत ते काय म्हणतात हे पाहण्यासाठी सांगितले होते. ते म्हणतील ते स्वीकारायचे की नाही आपला हा अधिकार आहे.आपण काही त्या रस्त्याने जायचे नाही. मात्र त्यांना काही सांगायचे आहे, काही बोलायचे असेल तर ते ऐकून न घेणे हे योग्य नाही.

- Advertisement -

यानंतर त्यांच्यात जी काही चर्चा झाली असेल कदाचित त्यामध्ये आपण सरकार तयार करू अशी त्यांनी भूमिका मांडली असेल, त्यांनतर एक दोन दिवसांत माझी आणि अजित पवारांची भेट झाली, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांचे काय म्हणणे आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यावेळी मी कामात असल्यामुळे आपण नंतर बोलूया असे सांगितले होते. तेव्हा फडणवीस यांच्याबरोबर जायचे नाही ही गोष्ट आमच्या मनात होती. मात्र, त्यांचे मत काय हे जाणून घेण्याची आमची इच्छा होती.

दरम्यान दुसर्‍याबाजूने आमची चर्चा वेगाने सुरू होती. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून एकादिवशी मला स्पष्ट सांगण्यात आले की, आम्ही बरोबर येण्यास तयार आहोत. मला असे वाटते की जर भाजपपासून शिवसेना बाजूला येणार असेल तर महाराष्ट्रात एक वेगळी स्थिती आपण निश्चित निर्माण करू शकतो. शिवसेनेबाबतची काँग्रेसची नाराजी आपण दूर करू. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एक वाक्यता झाली, असे शरद पवार म्हणाले.

याचदरम्यान अजित पवार यांनी भाजपला भेटून राज्यपालांना जी यादी दिली होती, ती आमच्या बैठकांना हजर असलेल्यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या जातात, त्याच्या तीन ते चार कॉपी आम्ही घेत असतो त्यातील एक कॉपी होती, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांची विधीमंडळ नेता म्हणून निवड करण्यात आलेली होती. त्यामुळे त्या याद्या त्यांच्याकडे होत्या. त्यातील एक यादी त्यांनी घेतली व नेहरू सेंटरमधील काँग्रेस आणि माझ्यात झालेल्या वादाचा राग डोक्यात ठेवून त्यांनी ती देवेंद्र फडणवीस यांना दाखवून राज्यपालांकडे सुपूर्द केली, त्यानंतर सर्व वेगवान घडमोडी घडल्या.

मला मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी अजित पवार यांना सांगण्यात आले होते की तुम्ही जर आजच्या आज शपथ घेणार असला तर आम्ही हे करणार अन्यथा करणार नाही. त्या क्षणी अजित पवार यांनी हो म्हणून सांगितले आणि शपथ घेतली. मात्र याबद्दल मला काहीही माहिती नव्हते. मला जेव्हा याबाबत सकाळी सहा वाजता कळाले तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. माझ्या नावाचा वापर करून अजित पवारांबरोबर असलेल्यांना त्या ठिकाणी नेलेले असावे, अशी मला त्यांना पाहिल्यानंतर खात्री झाली. अन्यथा ते जाऊच शकत नाहीत, असे शरद पवार म्हणाले.

अजितने घाईघाईत निर्णय घेतला. मी विश्रांती घेत होतो. सकाळी मला घरातूनच कोणाचातरी फोन आला तेव्हा समजले. याचाशी तडजोड न करता ही चूक मोडून काढायची असा निर्णय घेतल्याचे पवारांना सांगितले. अजित पवार कधी भेटले?महाराष्ट्रातील निर्णय अजित पवार घेतात. महाराष्ट्राला माझा यात सहभाग नव्हता या संदेश द्यायचा होता. पत्रकार परिषदेत मी भूमिका मांडली. यानंतर लोकांना विश्वास पटला. दुसर्‍या दिवशी अजित पवार सकाळी सहा वाजता मला भेटायला आले. चूक झाल्याची माफी मागितली. याची काय असेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मी त्याला तू अक्षम्य चूक केल्याचे सांगितले. तसेच किंमत मोजायला तू अपवाद नसल्याचेही सांगितले, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.

पक्षाच्या नेत्यांना अजित दादा तप्तर धावून जातात, त्यांची काम करण्याची धडाडी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहून या नेत्यांनी अजित पवारांवर कारवाई न करण्याची विनंती केली. यामुळे मी त्याला माफ केल्याचेही पवारांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी अजितला शपथ देणे योग्य वाटत नव्हते. कारण राज्यात माझ्याबाबत वेगळा संदेश गेला असता म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली नसल्याचाही खुलासा शरद पवारांनी केला.

मोदींची ऑफर नाकारली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सत्तास्थापनेची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर युतीला स्पष्ट बहुमत मिळूनदेखील राज्यात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नव्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सर्व घडामोडींत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रस्थानी होते.

शरद पवारांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सत्तास्थापनेतील घडामोडींची रहस्ये उलगडली आहेत. या सर्व घडामोडीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांनी एकत्र येण्याची ऑफर मला दिली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या बंडाबद्दल बोलताना, भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळे करण्यास तयार आहोत. शरद पवार यांनी स्वतःची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, लोकांना असे वाटते की, मला याची पूर्ण कल्पना असेल, किंवा अजित पवारांच्या या अशा कृतीला माझा पाठिंबा असेल. परंतु, हे साफ चुकीचे आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती,असे स्पष्टीकरण पवारांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -