…म्हणून देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले, भाजपतील चाणक्य कोण?

क्लिपमध्ये प्रवीण चव्हाण यांनी ‘शरद पवारांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे आहे,’ असा उल्लेख केल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता

devendra fadanvis
devendra fadanvis

मुंबईः राज्यात सत्ता परिवर्तन झालं असून, एकनाथ शिंदेंच्या रुपाने राज्याला नवे मुख्यमंत्री लाभले आहेत. पण या सर्व राजकीय नाट्यात माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरत आहे. एकनाथ शिंदे यांच्या हाती महाराष्ट्राची कमान सोपवून भाजपने मास्टर स्ट्रोकद्वारे एकाच दगडात पक्ष्यांचा थवाच टिपल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा राजकीय अर्थ येत्या काही दिवसांत समजणार असून, पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांचे ‘डिमोशन’ का केले हा मोठा प्रश्न सतावतोय. देवेंद्र फडणवीसांचं राजकीय वजन कमी करण्यासाठी ही केंद्रीय नेतृत्वाने विचारपूर्वक रणनीती आखल्याची आता दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र असे असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्याएवढा विश्वासू, अभ्यासू नाव केंद्रीय नेतृत्वाला सापडत नसल्यानेच फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीसह गृहखाते देण्यावर एकमत झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन वाढतच चाललं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या नावाला एक वलय प्राप्त झालं होतं. गोव्याचे निवडणूक प्रभारी असताना देवेंद्र फडणवीसांनी 21 आमदारांना निवडून आणत गोव्यात अपक्षांच्या मदतीनं भाजपची एकहाती सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून कोट्यात नसलेली तिसरी जागासुद्धा जिंकून महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिला होता. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही फडणवीसांनी ती जागा खेचून आणली. विशेष म्हणजे विधान परिषदेची पाचवी जागाही संख्याबळाच्या अभावापायी भाजपला जिंकणे मुश्कील होते, परंतु फडणवीसांच्या करिष्म्याने ती जागासुद्धा भाजपच्या पदरात पाडून घेतली. गेल्या तीन ते सहा महिन्यांत देवेंद्र फडणवीसांची राजकीय उंची कमालीची वाढली होती. एक रणनीतीकार म्हणून देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये नावारुपाला येत होते. हेच केंद्रीय नेतृत्वासाठी डोईजड ठरत होते. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपद देऊन देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटल्याचे सांगितले जातेय.

गेल्या काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यांनी विधानसभेत दिलेल्या व्हिडिओ आणि ऑडिओमधील संवादाच्या क्लिपद्वारे मोठा गौप्यस्फोट केला होता. या क्लिपमध्ये प्रवीण चव्हाण यांनी ‘शरद पवारांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे आहे,’ असा उल्लेख केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

दुसरीकडे सुरुवातीपासूनच केंद्रीय नेतृत्व गृहमंत्रालयासारखं महत्त्वाचं पद एकनाथ शिंदेंच्या गटास देण्यास तयार नव्हते. कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रालय भाजपच्या विश्वासू नेत्याकडे राहावे, अशी केंद्रीय नेतृत्वाची धारणा होती. त्यामुळे ते पद देवेंद्र फडणवीसांशिवाय इतर कोणाकडे देण्यास भाजप तयार नव्हते. परंतु देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर फोन आणि ट्विट करत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना ते स्वीकारण्याचे आवाहन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनीही त्यांना आग्रह केला होता, मात्र फडणवीस तयार नव्हते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले. पण या सर्व घटनाक्रमात सी. टी रवींचं एक ट्विटही चर्चेत आलं आहे.

सी. टी रवी हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पर्यवेक्षक म्हणून महाराष्ट्रात आले होते. सी. टी. रवी हे शिंदे सरकार स्थापन करतानाही तिकडेच उपस्थित होते. काल रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी सी. टी. रवी यांनी ट्विट केले. त्या ट्विटमध्ये अमित शाहांचे फोटो पोस्ट करत देअर ईज ओन्ली वन चाणक्य इन इंडिया, असं म्हटलं आहे. त्यामुळे सी टी रवी यांना ट्विट करत नेमके काय सुचवायचं हेच समजून घेणं महत्त्वाचे आहे. सी टी रवी हे भाजपचे दक्षिणेकडील ताकदवान नेते आहेत. चिकमगरवल्ली थिम्मे गौडा रवी हे सी टी रवी म्हणून ओळखले जातात, हे एक भारतीय राजकारणी आहेत.

रवी हे कर्नाटकातील चिकमंगळूर जिल्ह्यातील असून, ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम केले. पुढे ते चार वेळा चिकमंगळूरमधून आमदार झाले. ते हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे आणि ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांसाठी ओळखले जातात. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. रवी 1999 मध्ये काँग्रेस उमेदवार सीएस सगीर यांच्याकडून पहिली निवडणूक हरले, परंतु पुढील निवडणुकीत ते परतले. 26 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले, 10 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांची कर्नाटक सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 4 ऑक्टोबर 2020 पर्यंत ते या पदावर होते. दुसऱ्या येडियुरप्पा सरकारमध्ये मंत्री झाले, पण सरकार पडले. देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्यात सी. टी. रवी यांचीही भूमिका मोलाची असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचाः शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री अशक्य, नव्या सरकारबाबत ठाकरेंची ठाम भूमिका