मुंबई : साधारणपणे तीन वर्षांपूर्वी राज्यासह जगभरात कोरोना महामारीचे थैमान सुरू होते. पण आता तो धोका टळल्याने राज्यात सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. आपले सरकार आले आणि कोरोनाच पळून गेला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. तसेच, कोरोनासंबंधीच्या आढावा बैठका का घेतल्या नाहीत, असा खुलासाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, विराट संस्था आणि रंगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगात रंगली दिवाळी’ या खास दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणेकर नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आशुतोष म्हस्के, रंगाईचे दिगंबर प्रभू, निवेदिका वीणा गवाणकर तसेच ठाणेकर रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौगुले आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले यांचे देखील कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/nZnRsNtUcK
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 13, 2023
कोरोनासारख्या कठीण काळात सर्वांनीच काम केले. डॉक्टर, नर्स अशा वैद्यकीय क्षेत्रातील लोक तर अहोरात्र मेहनत घेतच होते, त्याशिवाय, पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांसह इतरही सरकारी यंत्रणा कार्यरत होत्या. आम्हीही घराबाहेर पडून कामे करीत होतो, आमची ती जबाबदारीच होती, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर कोरोना पळून गेला.
मुख्यमंत्री म्हणून मी कोरोनाविषयक आकडेवारी आणि उपाययोजनांची माहिती सातत्याने घेत होतो. पण एकही आढावा बैठक घेतली नाही. एकही बैठक न घेता, मला जे करायचे होते ते करत होतो. मी बैठका घेत सुटलो असतो तर, कोरोनाचा बाऊ झाला असता. काही लोकांना तो हवा होता, काही लोकांना तो नको होता, असा टोला त्यांनी लगावला.