घरमहाराष्ट्र...म्हणून कल्याण पश्चिमचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले

…म्हणून कल्याण पश्चिमचे आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले

Subscribe

शिवसेनेचे नेक्स्ट टू म्हणून ज्यांच्याकडे बघितले जात असलेले ठाणे जिल्ह्याचे सर्वेसर्वा राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवीत गुजरात मधील सुरतेत कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांना सोबत घेत कल्याण मध्ये देखील सगळे आलबेल असल्याचा संदेश या अनुषंगाने मातोश्रीला देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कल्याण पश्चिमेत युतीचे सिटिंग आमदार म्हणून नरेंद्र पवार निवडणूक निवडून आले होते. युतीत तिकीट पुन्हा त्यांनाच भेटणार होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपाला धक्का देत सिटिंग आमदाराची उमेदवारी शिवसेनेकडे आपले कौशल्यपणाला लावीत चमत्कार घडवून आणला होता. कल्याण पश्चिम मतदार संघात शिवसेनेकडे किमान अर्धाडझन उमेदवारांनी तिकीटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधत मातोश्रीवर येजा सुरू केली. उमेदवारांमध्ये आपसातील मतभेदांमुळे तिकीट देण्यासाठी दिरंगाई होऊ लागली होती. किंबहुना मातोश्रीला देखील मतभेदाचा फायदा घेऊन बाहेरचा आयात उमेदवारी देण्याबाबत एकमत झाले होते.

- Advertisement -

मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णय क्षमता असल्याने कल्याण शहर प्रमुख असलेले विश्वनाथ भोईर यांचे नाव पुढे करीत या नावावर शिक्कामोर्तब करण्यास मातोश्रीला भाग पाडले. निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून सुरू असलेली पक्षातील अंतर्गत धुसफूस शिंदे यांनी एका बैठकीत मिटवून टाकत विश्वनाथ भोईर यांचे काम जिंकण्यासाठी करण्याचे आदेश जारी केले. एकीकडे भाजपाचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करीत विश्वनाथ भोईर यांच्या विरोधात निवडणुकीत शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांचे सर्वसामान्य शिवसैनिकांशी असलेल्या नाळ तसेच उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने होत असलेली पीछेहाट लक्षात घेऊन या निवडणुकीत मोठी रसद पुरविली आणि एकतर्फा विजय कल्याण पश्चिम मतदार संघात शिंदे यांनी दाखवून दिला. यामुळेच कल्याण शहर प्रमुख असलेले विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम मध्ये आमदार होऊ शकले.

आमदार विश्वनाथ भोईर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने कल्याणातील शिवसैनिकांमध्ये सध्यातरी आनंदीआनंद असल्याचे वातावरण आहे. कल्याण पश्चिमला बाहेरचा उमेदवार लादण्यापेक्षा स्थानिक उमेदवार म्हणून विश्वनाथ भोईर यांना मातोश्रीची इच्छा नसतानाही उमेदवारी पदरात पाडून घेत एकनाथ शिंदे यांनी सर्वशक्तीनिशी बळ दिल्याने विश्वनाथ भोईर एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने कोणीही आश्चर्य व्यक्त करू नये.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -