लोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा; अण्णा हजारेंचा पुन्हा मविआला आंदोलनाचा इशारा

social activist anna hazare warns maharashtra government protest on lokayukta law issue

राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर लोकायुक्त कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला आहे. दरम्यान लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. मात्र अडीच वर्ष होऊनही लोकायुक्त कायद्यासंदर्भात काहीच हालचाली न झाल्याने अण्णा हजारेंनी खंत व्यक्त केली आहे.

अण्णा हजारेंनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. लोकायुक्त कायदा तयार करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सरकारने लेखी आश्वासनही दिले. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठका पार पडल्या. मात्र दोन वर्षे उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर बोलण्यास तयार नसल्याचे अण्णा हजारेंनी सांगितले आहे.

अण्णा हजारेंनी पुढे म्हटले की, मुख्यमंत्री बोलण्यास तयार नाही. नेमक काय झालं ते समजायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे. अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली असल्याची माहिती अण्णांनी दिली आहे.

दरम्यान आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही अण्णा हजारेंनी निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आली. पण त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटतेय असं अण्णा हजारे म्हणाले.


पाकिस्तानच्या पेशावरमध्ये 2 शिखांची गोळी झाडून हत्या, पाक नेत्यांकडून निषेध व्यक्त