ना पीए ना स्टाफ; धनंजय मुंडेंचे वर्क फ्रॉम होम जोरात!

Dhananjay munde work from home
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे वर्क फ्रॉम होम

कोणताही मोठा राजकीय नेता, मंत्री, खासदार किंवा आमदार म्हटलं की पीए, स्टाफ, कार्यकर्ते असा मोठा लवाजमा आजुबाजूला असते. सध्या कोरोनामुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याभोवती वेगळेच चित्र दिसत आहे. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या सर्व स्टाफला ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या आहेत. स्टाफ नसला तरी धनंजय मुंडे हे एकटेच वर्क फ्रॉम होमचा धडाका लाऊन किल्ला लढवत आहेत.

मुंडेंनी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवले असून सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजासह दिवसभरात ते अनेकदा बीड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्ह्यातील अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कोरोनाच्या संदर्भातील आढावा घेत असतात व विविध सूचना देत असतात.

सकाळी प्राणायाम करणे, वर्तमानपत्र उपलब्ध नसल्याने मोबाईल वरूनच विविध वर्तमानपत्रांच्या डिजिटल प्रती वाचणे त्याचबरोर फोनवरून राज्यातील विविध घडामोडींचा आढावा घेणे असा त्यांचा दिनक्रम आहे. आर्थिक वर्ष अंतिम टप्प्यात असल्याने सामाजिक न्याय विभागातील विविध प्रलंबित कामांच्या बाबतीतही मुंडेंनी मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना संदर्भातील उपाययोजना, तसेच राज्यभरातील ऊसतोड कामगारांची जेवण व निवासाची व्यवस्था, बीड जिल्ह्यातील ७१८८ घरकुलांना मंजुरी, राज्यातील सर्व दिव्यांगांना एक महिन्याचे रेशन व अन्य सुविधा असे अनेक महत्वपूर्ण निर्णय या काळात धनंजय मुंडे यांनी घेतले आहेत. परळी मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातील अनेक लोक फोन व अन्य माध्यमातून आपण लॉकडाऊन मुळे अडकल्याच्या किंवा तत्सम अन्य तक्रारी मुंडेंना कळवतात. तेव्हा कोणताही पीए किंवा अन्य कर्मचारी मदतीला नसताना देखील मुंडे ते विषय जिथल्या तिथे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात.

गेल्या दोन दिवसात त्यांच्या ‘नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत ५००० पेक्ष्या अधिक हातावर पोट असलेल्या गरजूंना २१ दिवस पुरेल इतका किराणा मोफत वाटप करण्यात आला आहे.