आपलं महानगर वृत्तसेवा
पनवेल : नवी मुंबईतील खारघर येथील एका युवतीला तिच्या इन्स्टाग्रामवरील कथित मित्राने नग्न व्हिडीओच्या बदल्यात पैशांची मागणी करत ब्लॅकमेल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिने रेहान खान याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईतील या 27 वर्षांच्या युवतीला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तिच्या होकारानंतर त्याने त्याचे नाव रेहान खान असे सांगून तो यूकेमध्ये राहत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले. ते नेहमी चॅटिंग करू लागले. 15 जुलै रोजी रेहानने त्या तरुणीला व्हिडिओ कॉल केला आणि प्रेमाची गळ घालून तिला नग्न होण्यास सांगितले. प्रेमात बुडालेल्या त्या तरुणीने त्याचे ऐकले आणि रेहान खानने ते रेकॉर्ड केले.
हेही वाचा… Raigad Adivasi Women Death : विठाबाईंच्या मृत्युला जबाबदार कोण?
त्यानंतर 16 जुलै रोजी युवतीला फोन करून तुझ्यासाठी यूकेमधून कपडे, ज्वेलरी आणि मेकअपचे सामान पाठवल्याचे त्याने सांगितले. ते उद्या भारतात येतील. फक्त टॅक्सचे पैसे भरून ते तू ताब्यात घे, असे त्याने सांगितले. त्यावर तिने पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतर तुझा नग्न व्हिडीओ माझ्याकडे असून तुझे आयुष्य बरबाद करेन, अशी धमकी त्याने दिली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर 20 हजार दे नाहीतर तुझा नग्न व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकीही दिली. त्यानंतर त्याने तिला तो नग्न व्हिडिओ पाठवला. यामुळे घाबरलेल्या युवतीने व्हिडिओ व्हायरल करू नको, अशी गयावया केली. मग त्याने वारंवार तिच्याकडे पैशांची मागणी केली, त्यासाठी फोन केले, मेसेज केले. त्यानंतरही पैसे न पाठवल्याने त्याने तिचा रेकॉर्डिंग केलेला व्हिडिओ मित्र, नातेवाईक यांना व्हॉट्सअॅपने पाठवला.
हेही वाचा… Thane:ऑनलाइन ठगांना सीमकार्ड पुरवणारी टोळी अटकेत
त्यानंतर या युवतीने खारघर पोलिसांकडे धाव घेतली आणि झालेली घटना सांगितली. पोलिसांनी रेहान खान यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
(Edited by Avinash Chandane)