ज्‍येष्‍ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे पुण्यातील रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Dr. Prakash Amte) यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसर (Blood Cancer)चे निदान झाले आहे. तसेच त्यांना न्यूमोनियाची सुद्धा लागण झाली आहे. मागील दहा दिवसांपासून न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना खूप ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना तातडीने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्यात विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी डॉ. प्रकाश आमटे हे आले होते. याचदरम्यान त्यांना तीव्र ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विविध तपासण्या सुरू असून पुढील काही दिवसांसाठी त्यांना डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

डॉ. प्रकाश आमटे हे पद्मश्री विजेते बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत. प्रकाश आमटे यांच्या समाजकार्याबद्दल त्यांना पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या लोकबिरादरी प्रकल्प या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी वडील बाबा आमटे यांचे समाजकार्य पुढे नेण्याचे ठरवले. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. त्यांच्या जीवनावर आधारित डॉ. प्रकाश आमटे: द रिअल हीरो हा चित्रपट देखील २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.


हेही वाचा : उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, अमोल मिटकरींचा सदाभाऊंना टोला