बेकरी चालकाची क्रूरपणे हत्या; टमटमसह मृतदेह जाळून पुरावाही केला नष्ट

एका बेकरी चालकाची क्रूरपणे हत्या करुन चालकाला टमटमसह जाळल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे.

solapur a man brutally killed body burnt with vehicle to destroy the evidence
बेकरी चालकाची क्रूरपणे हत्या

एका बेकरी चालकाची क्रूरपणे हत्या करुन चालकाला टमटमसह जाळल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय घडले?

सोलापूरच्या माढा तालुक्यातील शिराळ येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला आहे. संजय मारुती काळे (५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संजय काळे हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार; संजय काळे हे शनिवारी २५ जुलै रोजी जेवण करुन आपल्या घराच्या अंगणात झोपले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान ते आपले वाहन घेऊन घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले.

दरम्यान, सकाळी ते घरात नसल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले. तसेच त्यांना फोन केला असता त्यांचा फोन देखील बंद आला. शिवाय त्यांची अंगणासमोर उभी केलेली गाडी देखील दिसली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. रविवारी २६ जुलै रोजी शेवरे येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्यालगत लोकांना एक वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. हा मृतदेह संजय काळे यांचाच असल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

या घटनेची पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; शरीराचा छातीपासून थोडावरचा भाग शीर आणि एक हात शाबूत होता. उर्वरित शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह वाहनासह जाळण्यात आला होता. पोलिसांनी आता या घटनेचा तपास सुरु केला असून अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.


हेही वाचा – Supreme Court : आजपासून मराठा आरक्षण सुनावणीला सुरूवात