पुणे – आगामी विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात जाहीर केली जाईल आणि 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होईल असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी उमेदवार जाहीर करेल असेही शरद पवार म्हणाले आहेत. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या शरद पवारांच्या भेटी वाढल्या आहेत. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही समावेश आहे. शरद पवार रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तिथून पुण्यात परतल्यानंतर लागलीच माढ्याचे विद्यामान आमदार बबन शिंदे हे शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहे. तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे देखील पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहचले आहेत. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजितदादांना माढ्यातून धक्का, आमदार शरद पवारांच्या भेटीला
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बहुतेक आमदारांनी अजित पवारांना साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणूक जवळ येत असताना अजित दादांसोबत गेलेले आमदार, पदाधिकारी पुन्हा शरद पवारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. माढ्याचे विद्यामान आमदार बबन शिंदे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. याआधी दोन वेळा त्यांनी पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
कोण आहेत बबन शिंदे?
बबन शिंदे हे माढातील बडे प्रस्थ आहे. 1995 मध्ये बबनराव शिंदे अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले. शरद पवार यांच्या जवळचे आमदार म्हणून त्यांना ओळखले जाते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बबन शिंदे हे अजित पवारांसोबत गेले. सध्या बबन शिंदे यांच्या गावभेटी, मतदारसंघात दौरे सुरु आहेत. या दरम्यान त्यांनी निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत.
“आगामी विधानसभा निवडणुकीत मी उभा राहीन की नाही याबाबत शंका आहे”, असं वक्तव्य बबनराव शिंदे यांनी ऑगस्टच्या अखेरीस एका छोटेखानी सभेत केलं होतं. “माझ्या मुलाला या निवडणुकीत एक संधी द्या, तो त्या संधीचं सोनं करून दाखवेल”. बबनराव शिंदे यांच्याऐवजी या निवडणुकीत त्यांचे पुत्र रणजीत शिंदे हे माढ्यातून विधानसभेच्या रिंगणात उतरतील असे संकेत स्वतः बबनराव शिंदे यांनी दिले आहेत. अजित पवार मुलाला संधी देतात की वडिलांनाच आग्रह करतात हे काही दिवसांत कळेलच. तत्पूर्वी शरद पवार गटाकडून बबनराव शिंदेविरोधात जोरदार आघाडी उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
बबन शिंदेंनी दुसऱ्यांदा घेतली भेट
बबन शिंदे यांनी दोन आठवड्यांपूर्वी शरद पवार यांचीही भेट घेतली होती. आज (सोमवार) पुन्हा एकदा ते शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा शरद पवारांकडे येणार का, अशीही चर्चा मतदारसंघात सुरु आहे. त्यामुळे शरद पवार बबन शिंदेंना आपल्या पक्षात घेऊन पावन करणार का, अशी चर्चा मतदारसंघात आहे.
दरम्यान, बबन शिंदे यांच्या विरोधातील आठ जणांनी गेल्या आठवड्यात टेंभुर्णी येथील अती महारुद्र महादेव मंदिरात एकत्र येत शपथ घेतली होती. या आठ जणांपैकी कोणाही एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली तर त्याचे स्वागतच करु असे त्यांनी ठरवले होते. मात्र बबन शिंदेच आता शरद पवार गटात येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Edited by – Unmesh Khandale