घरमहाराष्ट्रदलित मतांच्या विभाजनामुळे मतदारांचा कौल भाजपला

दलित मतांच्या विभाजनामुळे मतदारांचा कौल भाजपला

Subscribe

सोलापूर मतदारसंघात दलित मतांच्या विभाजनामुळे मतदारांचा कौल भाजपला असल्याचे चित्र आहे.

सोलापूर मतदारसंघात आंबेडकर यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या परंपरागत दलित, ओबीसी आणि मुस्लिम मतांचे विभाजन होण्याचा धोका आहे. लिंगायत जंगम असलेल्या महास्वामीजींना भाजपने उमेदवारी देऊन लिंगायत मते मिळविण्यासह धार्मिक कार्डही खेळले आहे. आता मतदारांचा कौल भाजपाच्या बाजूने जास्त झुकत असल्याचे दिसून येते. याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

तिहेरी लढतीबाबत बोलताना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, “विविध जातींच्या लोकांनी केलेल्या मागणीवरून आपण सोलापुरातून लढत आहोत. माझी खरी लढत ही भाजपसोबत आहे.”

- Advertisement -

जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी सांगितले की,”आपली खरी लढत ही आंबेडकर यांच्यासोबतच आहे. शिंदे यांना यापूर्वी भाजपने पराभूत केलेले असून या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच लढत होत आहे. या दोन्ही नेत्यांचे दावे काहीही असले तरी सोलापुरात तिरंगी लढतच होत आहे.”

असा आहे मतदार संघ

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार तब्बल ११ वेळा विजयी झालेला आहे. भाजपच्या उमेदवाराने चारवेळा विजय प्राप्त केलेला आहे. एकूण १७ लाख मतदारांपैकी १५ टक्के मुस्लिम, १३ टक्के अनुसूचित जाती, ५० टक्के ओबीसी व विमुक्त जातीचे मतदान आहे. लिंगायत समाजाचा या मतदारसंघावर प्रभाव असून अडीच लाख मतदान आहे. त्यामुळे लिंगायत समाजातील जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना उमेदवारी देऊन भाजपने धार्मिक कार्डही खेळले आहे. जवळच असलेल्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातून आलेले हिंदी, तेलुगु आणि कन्नड भाषिक मतदारांची मतेही या मतदारसंघात निर्णायक ठरत असतात.

- Advertisement -

आश्वासने पूर्ण झालेली नाही

दलित, मुस्लिम व ओबीसी समाजाची मते काँग्रेसला पर्यायाने सुशीलकुमार शिंदे यांना मिळत आलेली आहेत. २०१४ मध्ये मोदी लाटेत शिंदे यांचा शरद बनसोडे या भाजपच्या उमेदवाराने दीड लाखांच्या फरकाने पराभव केल्यानंतर शिंदे यांच्या या हक्‍काच्या मतांबाबत त्यांना पुनर्विचार करावा लागत आहे. ही परंपरागत मते कायम ठेवण्यासाठी शिंदे यांची यंत्रणा जोमाने कामाला लागलेली आहे. भाजपने सोलापूरकरांना जी विकासाची आश्‍वासने दिली ती पूर्ण झालेली नाहीत, हा एक मुद्दा शिंदे यांच्या हाती असला आणि भाजपच्या विद्यमान खासदाराने काहीही विकासकामे न केल्याचा जनमताचा राग शिंदे यांना फायदेशीर असला तरी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीने ‘ट्वीस्ट’ निर्माण झालेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई व दलित, मागासवर्गीय समाजाचा पाठिंबा, ‘एआयएमआयएम’ पक्षाचा पाठिंबा पर्यायाने मुस्लिम मतांचे सहाय्य यामुळे आंबेडकर यांची उमेदवारी शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -