सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखोंच्या देणग्या

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप

MP Sanjay Raut accuses Kirit Somaiya of corruption

पश्चिम बंगालमधील ज्या मेट्रो डेअरीची अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत चौकशी सुरू आहे, त्या कंपनीकडून किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांच्या देणग्या मिळाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

पश्चिम बंगालमध्ये मेट्रो डेअरी म्हणून कंपनी असून त्या कंपनीच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेत गैरव्यवहार झाले आहेत. त्यासंदर्भात ईडी आणि सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत. या कंपन्या किरीट सोमय्या यांच्या प्रतिष्ठानला देणग्या कशा देतात, असा सवाल करून अशा एकूण १७२ कंपन्या असल्याचे सांगत राऊत यांनी मेट्रो डेअरीच्या गैरव्यवहारांची कागदपत्रे माध्यमांसमोर सादर केली.

हे प्रकरण फक्त हिमनगाचे एक टोक असून याहीपेक्षा मोठी प्रकरणे बाहेर येतील. भ्रष्टाचारविरोधी असल्याचा मुखवटा घालून सोमय्या नावाचा माणूस गेली अनेक वर्षे उद्योगपती, कंपन्या, व्यापारी, बिल्डर्स यांच्याकडून खंडण्या गोळा करत आहे. ज्या कंपन्यांवर ईडी, सीबीआयची चौकशी सुरू आहे, काही कंपन्यांवर धाडी पडणार आहे किंवा पडताहेत अशा कंपन्यांकडून हे महाशय देणग्या उचलतात, असा आरोप संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला.

किरीट सोमय्या हेच सर्वात मोठे भ्रष्टाचारी असताना ते महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त कसा करणार? सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी आणि सीबीआयकडून कसे पैसे मिळतात, असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला.