बंडखोर आमदारांचे पुत्र युवासेनेत विद्यमान पदाधिकारी सर्वसामान्य युवासैनिकांची होतेय हकालपट्टी

शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करीत स्वतंत्र गट स्थापन करून थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामुळे या बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्यात आली, मात्र युवासेनेचे या बंडखोर आमदारांच्या मुलांवरील पुत्रप्रेम अद्यापही कायम आहे.

aaditya thackeray
आदित्य ठाकरे

शिवसेनेतील ४० आमदारांनी बंडखोरी करीत स्वतंत्र गट स्थापन करून थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामुळे या बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्यात आली, मात्र युवासेनेचे या बंडखोर आमदारांच्या मुलांवरील पुत्रप्रेम अद्यापही कायम आहे. बंडखोर आमदारांचे पुत्र हे थेटपणे शिंदे गटाचे समर्थन करीत असूनही ते युवासेनेचे विद्यमान पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्याऐवजी सर्वसामान्य युवासैनिकांची हकालपट्टी करण्याचा अजब प्रकार युवासेना प्रमुखांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक व युवासैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत शिवसेनेला भलेमोठे खिंडार पाडले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होऊन सत्तेमध्ये असलेले महाविकास आघाडी सरकार अवघ्या काही क्षणात कोसळले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या ४० आमदारांनी स्वतंत्र शिंदे गट स्थापन करीत थेट शिवसेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आमदारांवर कारवाई करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. बंडखोरी केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या ४० आमदारांमधील काही आमदारांचे पुत्र अद्यापही युवासेनेतील विद्यमान पदाधिकारी आहेत. बंडखोर आमदार रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम युवासेना कोअर कमिटी सदस्यपदी आहे.

आमदार यामिनी जाधव यांचा पुत्र मुंबई विद्यापीठामध्ये युवासेना सिनेट सदस्य आहे. किशोर पाटील यांची मुलगी प्रियंका पाटील ही जळगावमधील युवासेनेची युवती विस्तारक आहे. युवासेनेतील हे विद्यमान पदाधिकारी शिवसेना-युवासेनेत राहून थेट शिंदे गटाचे समर्थन करीत आहेत, मात्र असे असूनही त्या पदाधिकार्‍यांवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही किंवा त्यांच्याकडून राजीनामे घेण्यात येत नाहीत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिक व युवासैनिकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र त्याचवेळी बंडखोर आमदारांच्या पुत्रांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याउलट सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एखादा विषय काढला तरी त्यांची तातडीने हकालपट्टी होत आहे.

युवासेना सचिवपदी असलेल्या ठाण्यातील एका पदाधिकार्‍याने काही दिवसांपूर्वी थेट शिंदे गटाचे समर्थन करीत त्यांचे कार्यक्रम केले. त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी त्याची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली, मात्र सर्वसामान्य पदाधिकार्‍यांवर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याने युवासेना प्रमुखांच्या कार्याबाबत युवासैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावण पसरले आहे.