घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 'या' ठिकाणी उभारले जाणार आसाम भवन; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी उभारले जाणार आसाम भवन; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

Subscribe

सत्तासंघर्षात केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आसामच्या मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान

गुवाहाटी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी रेडिसन ब्लु हॉटेलमध्ये आज सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्र आणि आसाम राज्यामध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच या दोन राज्यात उद्योग, व्यापार, पर्यटनात वाढ व्हावी यासाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गुवाहाटी दौऱ्यावर असून त्यांच्यासह आलेले आमदार, खासदार, पदाधिकारी यांची सारी व्यवस्था आसाम सरकारने केली होती. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात उभारल्या जाणाऱ्या आसाम भवनाबद्दलही माहिती दिली आहे.

आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यास परवानगी 

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सत्ता संघर्षाचा काळात सलग 11 दिवस गुवाहाटी मध्ये होतो मात्र तेव्हा सगळ्यांच्या मनावर प्रचंड दडपण होतं, मात्र आता हे दडपण दूर झाले असून तेव्हा ज्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते त्याच कामाख्या देवीचे आज मुख्यमंत्री बनून पुन्हा दर्शन घेताना एक वेगळंच समाधान मिळालं असल्याचे उद्गार काढले. या केलेल्या मदतीतून उतराई होणं शक्य नसले तरीही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नवी मुंबईमध्ये आसाम भवन बांधायला शिंदे यांनी होकार दिला, तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आसाम सरकारने जागा देण्यास तयार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जाहीर केले.

- Advertisement -

आसामचे मुख्यमंत्री हेमंता सरमा यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत अलेल्या 50 आमदारांनी भारत मातेचे नाव अधिक उंचावेल असं काम केल असल्याचे गौरवोद्गार काढले. आपल्या पक्षाची दिशा चुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ती चूक दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी त्यांना लागलं ते सर्व सहकार्य आम्ही सरकार म्हणून केलं. आज महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने आणि वेगाने काम करतेय ते पाहून आम्ही केलेली मदत योग्यच होती याची खात्री वाटत असल्याचं मत सरमा यांनी व्यक्त केलं.

आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्रातून येतात. त्यांना सोयी सुविधा पुरवणे, महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना लागेल ती मदत उपलब्ध करून देणे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाकडून शक्य ते सारे प्रयत्न केले जातात. या मंडळातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी काही वर्षे आसाम राज्यात सेवा बजावल्यानंतर या दोन्ही राज्यामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या अनेक साम्यस्थळे असल्याचे जाणवल्याने या दोन्ही राज्यांना सांस्कृतिकदृष्ट्या जवळ आणण्याची गरज जाणवू लागल्याचं सांगितले.

- Advertisement -

राज्यांना जोडणारे सांस्कृतिक भवन आसाममध्ये उभारावे

आपल्या राज्याला असलेली भक्तीमार्गाची मोठी परंपरा आसामच्या संस्कृतीमध्ये देखील रुजलेली आहे. आपल्याला असलेली वीररसाची परंपराही आसाम राज्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वर्षे आधी आसाम मधील लसीत बार फुकान यांनी देखील मुघलांच्या विरोधात लढा दिला होता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांना स्फूर्तीस्थान मानणारा मोठा वर्ग आसाममध्ये आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठी आणि असामी भाषेत देखील अनेक शब्द समान आहेत कारण मराठीप्रमाणे आसामीमध्ये देखील आईला ‘आई’च म्हंटले जाते कदाचित दोन भारतीय भाषांमध्ये केवळ याच दोन भाषांमध्ये हे साम्य असावे, याशिवाय साहित्य, कला, संस्कृती, जडणघडण यात अनेक साम्य आहेत त्यामुळे या दोन राज्यांना जोडणारे सांस्कृतिक भवन आसाममध्ये उभारावे अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीसाठी सकारात्मकता दाखवताना ही दोन राज्ये एकमेकांच्या अधिक जवळ यावीत तसेच सांस्कृतिक दृष्टीने जोडली जावीत यासाठी नक्की काय करता येईल ते नक्की करू अशी ग्वाही दिली. तसेच या मंडळाने केलेल्या मागणीनुसार आसाममध्ये महाराष्ट्र भवन सांस्कृतिक भवन आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिरही उभारण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच आसाम मधील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनात महाराष्ट्र आणि आसाम मधील लोकसंस्कृती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंग, राज्यातील संतांबद्दलची माहिती याचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.

तसेच या कामासाठी राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादाजी भुसे यांची विशेष समन्वयक म्हणून नियुक्ती देखील करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच आसाम आणि महाराष्ट्र यांच्यातील औद्योगिक संबंध वाढावे यासाठी मंत्री उदय सामंत हेदेखील प्रयत्न करतील असे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

राज्यात सत्ता स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा गुवाहाटीला येण्याची विनंती देखील केलेली होती, त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री सरमा यांनी या सर्वांसाठी खास प्रीतीभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी सरमा यांनी राज्यातील आमदार, खासदार आणि त्यांच्या कुटूंबियांची आस्थेने विचारपूस केली. तब्बल दोन तास हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात केलेल्या मदतीबद्दल आभार मानताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना खास गणपतीची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच आता एकदा महाराष्ट्राचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी सरमा यांनी नक्की यावे असे सांगून त्यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रणही दिले. या कार्यक्रमाच औचित्य साधून सत्तासंघर्षाच्या काळात सहाय्य करणाऱ्या आसाम सरकार मधील मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -