मतदार कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी विशेष मोहिमेला सुरवात

नाशिक : लोकसभा व विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी, मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ज्यामध्ये सर्व मतदारांचे मतदार ओळखपत्र त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाईल. यासाठी मतदारांना फॉर्म- ६ ब भरून जमा करावा लागणार आहे. ही मोहीम मतदार याद्या आधीकाधीक निर्दोष करण्यासाठी उपयुक्त असली तरी ती ऐच्छीक असणार आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली आहे.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोग एक मोहीम राबवेल आणि मतदारांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डच्या क्रमांकाशी लिंक करेल. यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के मतदारांकडून स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्याचे लक्ष्य निवडणूक आयोगाने ठेवले आहे.या संदर्भात निवडणूक आयोगाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की,मतदार यादीतील विद्यमान मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज क्र. ६ ब तयार करण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीत नांव असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आले आहे. मतदारांसाठी आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक असणार आहे. मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणिकरण करणे, तसेच एकाच व्यक्तिचे एकापेक्षा जास्त मतदार संघात अथवा त्याच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नावाची नोंदणी तपासण्यासाठी आणि मतदारांची ओळख प्रस्थापित करणे, तसेच भविष्यात मतदारांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने मतदारांकडून आधार क्रमांकाचे संकलन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळता येणार नाही, असेही आयोगाने पत्रात नमुदकेले आहे.

मतदार यादीची पडताळणी सोपी होणार

या निर्णयामुळे मतदारांची ओळख पटवणे, मतदार यादीत समाविष्ट असलेल्या माहितीची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यासोबतच एकापेक्षा जास्त मतदारसंघात नावे नोंदवणाजयांचीही ओळख पटवली जाणार आहे.

४ सप्टेंबरला विशेष शिबीर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुधारणांची अंमलबजावणी १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानुसार मतदार यादीतील तपशील प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधार क्रमांकाची माहिती संकलीत करण्याकरीता ४ सप्टेंबर २०२२ ला पहिल्या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

असे करा आधार लिंक

विशेष शिबीराच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फतही घरोघरी भेटी देऊन माहिती संकलीत करण्यात येणार आहे. याबाबत https://nvsp.in/ किंवा https://ceo.maharashtra.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असेल.