झरीफ बाबाच्या आर्थिक व्यवहार चौकशीसाठी आता विशेष समिती

सुफींच्या खूनप्रकरणाचा उलगडा होऊनही ग्रामीण पोलिसांची डोकेदुखी थांबेना; पथक करणार मालमत्तेची तपासणी

नाशिक : येवल्यात अफगाण निर्वासित सुफी संत झरीफ बाबाचा खून झाल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. काही दिवसांतच या खुनातील मारेकरी पोलिसांनी जेरबंद करून केवळ संपत्तीसाठी बाबाचा खून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आता बाबाच्या सोशल मीडियाद्वारे कमावलेल्या बक्कळ मालमत्तेचा हिशोब लावण्यासाठी अन् चौकशीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नियुक्त केली असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

येवला पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुलैमध्ये अफगाणी सुफी संत झरीफ अहमद चिश्ती यांची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर बाबाचे एक ना अनेक उत्पन्न स्त्रोत अन् मृत्यूची कारणे समोर येऊ लागली होती. बाबाने भारतात आल्यावर चार वर्षात आपल्या चेल्यांच्या नावावर तीन ते साडेतीन कोटी रुपयांची ‘माया’ जमवली होती. मुळात अफगाण निर्वासित असल्याने बाबाला स्वत:च्या नावावर कुठलाही व्यवहार करता येत नव्हता, शिवाय काहीही खरेदी करता येत नव्हते. यातूनच चेल्यांची वक्रदृष्टी पडून बाबावर हल्ला झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आता बाबाच्या एकूण मालमत्तेसाठी झालेले आर्थिक व्यवहार पोलिसांच्या रडारवर असून, ग्रामीण पोलिसांनी यासाठी विशेष चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे आता झरीफ बाबा खून प्रकरणी आणखी माही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झरीफ बाबा हे गेल्या चार वर्षांपासून भारतात आश्रयास होते. या दरम्यान बाबाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅनल सुरू करून सुफी विचार मांडण्याचा व्यवसाय थाटला होता. परिणामी, चार वर्षात बाबाचे लाखो फॉलोवर्स आणि लाखो पैसे देणारे चाहेते निर्माण झाले होते. यातून प्रचंड घबाड बाबाने कमावलं होतं. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या संस्था आणि परदेशांतूनही त्यांना रक्कम दान म्हणून येत असल्याचे दिसून आले आहे. यातून बाबा कोट्यधीश झाला आणि जीव गमावून बसल्याचे आजवरच्या तपासातून दिसून आले आहे.

बाबाचा खून झाल्यानंतर शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह अफगाण अ‍ॅम्बेसीकडून सूचना येईपर्यंत नाशकात एका खासगी शवागारात ठेवण्यात आलेला होता. अफगाणीस्तानमध्ये दफनविधी करायचा असल्याने त्यासंदर्भातील नातलगांना व्हिसा मिळविण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात मृतदेह मुंबईकडे रवाना करून दुतावासामार्फत अफगाणीस्तानाला पाठवला गेला. परंतु, बाबाच्या कोट्यवधीच्या संपत्तीची चौकशी होणे क्रमप्राप्त असल्याने त्यादृष्टीने आता विशेष पथकाद्वारे तपास होणार असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

असे असेल चौकशी पथक

नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती बाबाने भारतात आल्यापासून आजवर केलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करणार असून, तसा अहवाल देणार आहे. यातून पुन्हा एकदा पोलिसांपुढे अनेक बाबी उलघडणार असल्याचे सांगितले जाते.