विशेष भाग ६ : जीन्सवाली गर्लफ्रेंड चालेल, पण बायको नको !

"तुझ माझ जमेना" घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणासंदर्भात आपली काही मते असल्यास ती ९०२२५५७३२६ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावीत.

नाशिक : नातेसंबंधातील तणाव, व्यसनाधिनता, मोबाईलचा अतिरेकी वापर यांमुळेच घटस्फोट होतो असे नाही. तर एका सर्वेक्षणानुसार आधुनिकीकरणाचा पुरस्कार करणे वा नाकारणेदेखील घटस्फोटाचे एक मोठे कारण ठरत आहे. त्यात आधुनिक जीवनशैलीमुळे ४३.९ टक्के, आधुनिक विचारामुळे ४५.३ टक्के तर आधुनिक कपड्यांचा पेहराव केल्यामुळे ४३.३ टक्के घटस्फोट होत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास येते.

फॅशनेबल प्रेयसी बहुतांश तरुणांना आवडते. परंतु तिने लग्नानंतर जीन्स, टीशर्ट सारखा आधुनिक पेहराव केला तर पतीसह त्याच्या अन्य कुटुंबियांना चालत नाही. घरातील नणंदने आधुनिक पेहराव केला तर तो खपवून घेतला जातो. किंबहुना अनेक ठिकाणी त्याचे कोडकौतुकही केले जाते. परंतु सुनेने साडीच नेसावी, पंजाबी ड्रेसच घालावा अशी अपेक्षा मात्र तिच्यावर लादली जाते. हे केवळ पेहरावावरच थांबत नाही. तर आधुनिक विचार असले तरी पतीला ते चालत नाही. त्याला देवपूजा करणारी, मोठ्यांना उलट उत्तर न देणारी, आपले विचार मोकळेपणाने न मांडणारी, लाजरी-बुजरी पत्नी हवी असते. त्यामुळे तो पत्नीकडून तशीच अपेक्षा करतो. पुरुषांबाबत मात्र बहुतांश ठिकाणी स्त्रियांच्या मताला किंमत दिली जात नाही. पुरुषाने कसा पेहराव करावा, त्याचे विचार कसे असावे, त्याने कसे वागावे याविषयी पत्नीसह अन्य कुणी अपेक्षा बाळगलेल्या त्याला खपत नाही. काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये पत्नीला पतीची आधुनिक जीवनशैली आवडत नसल्याचे दिसून येते.

नागपूर येथील कुटुंब न्यायालयात समुपदेशक असलेल्या संगीता साठवणे-पांडे यांनी ‘आधुनिक जीवनशैलीमुळे नवदाम्पत्यांमध्ये वाढलेली विभक्त होण्याची प्रवृत्ती व त्याचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम : समाजकार्य मध्यस्थी (कुटुंब न्यायालय नागपूर येथे न्यायप्रविष्ट केलेल्या नवविवाहित दाम्पत्यांचे अध्ययन)’ विषयावरील संशोधन पूर्ण केले. त्यात त्यांनी १९९६ ते २०१२ दरम्यान कुटुंब न्यायालयात विभक्तीकरणासाठी नोंद झालेल्या दाव्यांचा अभ्यास केला. त्यात विभक्त होण्यामागील विविध आश्चर्यकारक कारणे असल्याचे दिसून आली. या अध्ययनानुसार, विवाह हे पवित्र बंधन मानणार्‍यांची संख्या ४१.८ तर, सामाजिक-भावनिक बंधन मानणारे २७.५ टक्के आहे. लग्नानंतर वर्षभरातच भांडण होणार्‍यांचे प्रमाण ६८.४ टक्के तर वर्षभरानंतर वाद घालणारे ५४.३० टक्के आहेत. हल्ली घटना, प्रसंग काहीही असो, त्याचे प्रतिबिंब पटदिशी सोशल मीडियावर उमटत असते. त्याच मीडियामुळे विभक्त होणार्‍यांची संख्या २३.६३ टक्के आहे. आधुनिकीकरणाचा पुरस्कार करणे वा नाकारणेदेखील विभक्तीकरणाला कारणीभूत ठरत आहे. त्यात आधुनिक जीवनशैलीमुळे ४३.९ टक्के, आधुनिक विचारामुळे ४५.३ टक्के तर आधुनिक कपड्यांचा पेहराव केल्यामुळे ४३.३ टक्के घटस्फोट होत आहे.

एक वर्ष आजमावण्याचा ‘ट्रेण्ड’

एक वर्षापर्यंत एकमेकांच्या स्वभावाचा अंदाज घ्यावयाचा, नाही जमले तर विभक्त होऊन मोकळे व्हायचे, असा देखील ‘ट्रेण्ड’ सध्या बघायला मिळतो. यामध्ये गैर असे काही त्यांना वाटत नाही. सध्याच्या काळात करिअरला अधिक महत्त्व देणारीही पिढी आहे. मल्टिनॅशनल मोठया कंपन्या, आयटी क्षेत्र, बँका, इंजिनीअर, एमबीए आदी लाखोंचे पॅकेज असलेल्या तरुण-तरुणींना करिअर अधिक महत्त्वाचे वाटत असते. एक नोकरी मिळाली की त्यापेक्षा जास्त पॅकेज कुठे मिळेल याच्या शोधात ही मंडळी असतात. जास्त पॅकेज असलेली नोकरी मिळाली की परत जास्त अशा गलेलठ्ठ पगाराच्या मागे लागलेले तरुण दाम्पत्य एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी फिरताना दिसून येते आणि अशा सुसाट सुटलेल्या करिअरच्या आड जर जोडीदार (पती किंवा पत्नी) आला तर विचार पटत नाहीत म्हणून तडकाफडकी घटस्फोटाचा मार्ग स्वीकारला जातो.

आधुनिक जीवनशैलीमुळे पत्नी-पतीमध्ये वाद होत आहेत. सुनेने सासरकडील लोकांचे ऐकले पाहिजे. त्याप्रमाणे सासरकडील लोकांनी तिचाही आदर व सन्मान केला पाहिजे. सुनेकडे कोणीही संशयाने पाहू नये. पतीने तिला वेळ द्यावा. तिच्यावर कोणीही अधिकार गाजवू नये. पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवावा. : अ‍ॅड, सुप्रिया अमोदकर-देशपांडे

नव्या पिढीतील मुली उच्चशिक्षित व मोठ्या पगारावर नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्यांना वयाने मोठा नवरा नको आहे. त्याने आपलेच ऐकले पाहिजे, असे त्यांना वाटते. त्याने घरकाम केले पाहिजे, त्याने अपत्यासाठी आग्रह करू नये, अशी त्यांची अपेक्षा असते. परिणामी, पती-पत्नीमध्ये वाद होत असून, त्यातून ते घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहेत. : अ‍ॅड. राहुल वाणी, वकील