प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला परिक्षेत्राचे भारत सरकारकडून विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. कराळे यांना २०१३ मध्येही राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानिमित्त त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. (Special Inspector General of Police Karale awarded President’s Medal)
भारत सरकारकडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सैन्य दलाच्या विविध शाखांसह पोलीस दलातील अधिकारी यांना विशेष सेवा, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक महाराष्ट्रातील चार अधिकार्यांना जाहीर झाले आहे. यामध्ये कराळे यांचाही समावेश आहे. नाशिक परिक्षेत्रात नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. गतवर्षी जून महिन्यात त्यांनी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली. या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराळे यांनी सर्व पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षकांची वेळोवेळी बैठका घेत नियोजन केले. विधानसभा निवडणुकीच्या काळातदेखील कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही जिल्ह्यांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला.
अशी आहे कामगिरी
दत्तात्रय कराळे हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ‘यूनो’कडून यूगोस्लाविया देशातील कोसवा याठिकाणी आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातही त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे. यापूर्वी मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण पोलीस आयुक्तालयात त्यांनी उपायुक्त म्हणून कामकाज बघितले आहे. तसेच धाराशिव व जळगावमध्ये अपर अधीक्षक म्हणूनही त्यांनी कर्तव्य पार पाडले आहे. जळगाव अधीक्षकपदावर असताना त्यांना उपमहानिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. या पदावर त्यांनी दहशतवादविरोधी पथकातदेखील कर्तव्य बजावले आहे.