विशेष : नाशिकचे सांस्कृतिक वैभव अवघ्या ३ रंगमंदिरांमध्ये बंदिस्त

सुशांत किर्वे । नाशिक

चित्रपट, सिरियल्स आणि नाट्यक्षेत्रात आपला ठसा उमटवलेल्या नाशिकमध्येच हौशी आणि प्रायोगिक रंगकर्मींची गळचेपी होत असल्याचे चित्र आहे. या रंगकर्मींना नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी शहरात केवळ परशुराम साईखेडकर नाट्यगृह, कुसुमाग्रज स्मारक, कालिदास कलामंदिर आणि पं. पलुस्कर सभागृह हीच ठिकाणे आहेत. त्यातही ही सुसज्ज आहेत, त्यासाठी खिशाला कात्री लागत असल्याने प्रायोगिक चळवळींना ब्रेक लागतोय. नाशिकचा विकास ज्या गतीने होतोय, त्या गतीने नवीन नाट्यगृहे उभी राहिली नाहीत. जी उभी राहिली तीदेखील बंद आहेत. म्हणूनच नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, काव्य, लेखन क्षेत्रात समृद्ध नाशिकचे सांस्कृतिक पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी, मनोरंजनासह समाजप्रबोधनासाठी रंगकर्मींसाठी छोटेखानी, तंत्रसज्ज व आर्थिकदृष्ठ्या परवडणारे मिनी थिएटर व अ‍ॅम्फी थिएटर्स उभी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारसह महापालिकेचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबई व पुण्यानंतर सर्वार्थाने नाशिक शहराचा नंबर लागतो. नाशिकची ओळख मंत्र आणि यंत्रभूमी इतकीच न राहता आता वाईन कॅपिटल म्हणूनही झाली आहे. मुंबई-पुण्याप्रमाणेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांत नाशिक अग्रेसर आहे मात्र, केवळ सांस्कृतिक क्षेत्राचा विचार केल्यास महाराष्ट्रातील इतर महानगरांच्या तुलनेत याबाबतीत शहर पिछाडीवर आहे. नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, काव्य, लेखन याबाबत समृद्ध नाशिकमध्ये कलाप्रकार सादर करण्यासाठी रंगमंच अगदीच बोटावर मोजण्याइतकेच उपलब्ध आहेत.

महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, कुसुमाग्रज स्मारक, पंचवटीतील पं. पलुस्कर नाट्यमंदिर आणि नाशिक रोड येथील महापालिकेचा हॉल आहे. मात्र, हा हॉल बंद अवस्थेत आहे. यातील परशुराम साईखेडकर नाट्यगृह, पं. पलुस्कर नाट्यमंदिर व नाशिकरोडचा हॉल वातानुकूलित नाही. या ठिकाणी इतर सुविधांचीही वाणवा आहे. नाशिक शहर दिवसेंदिवस चारही बाजूने झपाट्याने विस्तारत आहे. मात्र, त्या तुलनेत रंगमंदिरांची संख्या अगदीच कमी आहे. पंचवटी व नाशिकरोडला महापालिका ४०० ते ५०० आसन क्षमतेचे थिएटर बांधत आहे. मात्र, विकसनशील नाशिकची सांस्कृतिक भूक मोठी आहे. त्यासाठी किमान चार प्रभाग मिळून बंदिस्त मिनी थिएटर आणि त्याची आसन क्षमता १०० ते २५० व ते सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण असावेत, ही काळाची गरज आहे.

 • छोटेखानी, तंत्रसज्ज, आर्थिकदृष्ठ्या परवडणार्‍या नवीन थिएटर्सची गरज
 • नाशिक शहरात हौशी, प्रायोगिक रंगकर्मींसाठी नाट्यगृहे तुटपुंजे
 • शहराच्या चारही बाजूस नाट्यगृहांअभावी प्रयोगांना मर्यादित प्रेक्षकांची उपस्थिती
 • आर्थिक बजेटनुसार नाट्यगृह नसल्याने रंगकर्मींच्या खिशाला का ?

मुख्य अडचणी…

 • नाशिक शहराच्या विस्ताराच्या तुलनेत बंदीस्त मिनी थिएटर, अ‍ॅम्फी थिएटर उपलब्ध नाहीत
 • नाट्यगृह मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नाट्यप्रयोगास मर्यादित प्रेक्षकांची उपस्थित असते. शहराच्या चारही बाजूचे प्रेक्षक अंतर अधिक असल्याने नाट्यप्रयोगास येण्यास टाळाटाळ करतात
 • नाट्यगृहाची आसनक्षमता अधिक असल्याने छोटेखानी नाट्यप्रयोग रंगकर्मींना सादर करता येत नाहीत
 • आर्थिक बजेट ठराविक असले तरीही नाट्यगृहाच्या भाड्यापोटी मोठी रक्कम जाते. हे हौशी रंगकर्मींना परवडत नाही
 • मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेकजण नाट्यगृहात जाण्यापूर्वी वाहन पार्किंगचाही विचार करतात.
 • प्रयोगाचे तिकीट पाचशे रुपये आणि प्रवास खर्च दोन-तीनशे होत असल्यास अनेक प्रेक्षक केवळ आर्थिक कारणास्तव नाट्यप्रयोगास जाणे टाळतात.
 • नाशिक शहरात रंगकर्मींची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी त्या तुलनेत नवीन प्रेक्षक वाढत नाहीत.
 • अनेक प्रेक्षक आर्थिक कारणास्तव किंवा नाटकापेक्षा चित्रपट बरा असा समज करुन घेत असल्याने नाट्यरसिकांची संख्या चित्रपट पाहणार्‍यांच्या तुलनेत कमी आहे.

राजाश्रयाची गरज

सांस्कृतिक वैभव हे केवळ मनोरंजनाचे क्षेत्र नाही. ते सामाजिक, राष्ट्रीय जीवनात सशक्त समाज निर्माण करणारे क्षेत्र आहे. त्यामुळे कलाकाराला सतत जागरुक ठेवणे, त्याच्या कार्याची दखल घेणे, हे कार्य विविध स्तरापर्यंत पेाहोचवण्याची गरज असते. समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सांस्कृतिक क्षेत्राचाही विकास झाला पाहिजे. त्यासाठी राजाश्रयाची गरज आहे. नाशिक शहरात सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. महापालिकेने शहरातील उद्याने, समाजमंदिरे व कालिदास कलामंदिराच्या आवारात अ‍ॅम्फी थिएटर उभारल्यास हौशी व प्रायोगिक रंगकर्मींना व्यासपीठ मिळेल.

जे पुणे, मुंबईत होवू शकते, ते नाशकात का नाही

मुंबई व पुण्यात सांस्कृतिक चळवळ रंगकर्मी आणि रसिकांमुळे टिकून आहे. नाशिकलाही सृजनशील रंगकर्मी व रसिकांमुळेही नवनवीन नाट्यप्रयोग होत आहेत. मात्र, मुंबई व पुण्याच्या तुलनेत नाशिक शहर पिछाडीवर आहे. त्यामुळे जे पुण्या-मुंबईत होवू शकते ते नाशकात नाही, असा सवालही रंगकर्मींकडून उपस्थित केला जात आहे. नाशिकमध्ये सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी उपनगरांमध्ये प्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्य पाहिजेस अशी प्रतिक्रिया अनेक रंगकर्मी व रसिकांनी दैनिक ‘आपलं महनगर’शी बोलताना व्यक्त केली. मिनी थिएटर, अ‍ॅम्फी थिएटरमुळे पुणे व मुंबईत नाट्यचळवळ टिकून आहे. मोठे नाट्यगृह आर्थिकदृया अनेकांना परवडत नाही. त्यामुळे सरकारने मॉल्सना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे बंधन करावे. परिणामी, मॉलमध्ये येणारे ग्राहक नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांना येतील. तसेच, बसस्टॅण्डच्या जवळपास लहान थिएटर असल्यास प्रवाशांना नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बसता येईल. महापालिकेच्या समाजमंदिर व हॉलमध्ये छोटेखानी थिएटर करता येतील, असे दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी सांगितले.

शक्य उपाययोजना… 

 • पाहिजेत, त्यासाठी रंगकर्मींनी सांस्कृतिक चळवळ उभी केली पाहिजे. परिणामी, हौशी व प्रायोगिक रंगकर्मींना प्रयोगसंख्या वाढीमुळे आर्थिक लाभ होईल.
 • तरुणाई ओटीटीवर चित्रपट व मालिका पाहणे पसंत करते. त्यांना रंगमंदिरात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत
  नाट्यप्रयोगांच्या तिकिटांचे मूल्य सर्वसामान्य नागरिकांना परवडेल एवढे असावे
 • नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रम शहरातील नाट्यगृहांसह उपनगरांमध्येही झाले पाहिजेत
 • सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी रंगकर्मींच्या अडचणी सोडवण्यासह प्रेक्षकवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत
 • लोकप्रतिनिधी व महापालिकेने उपनगरनिहाय अ‍ॅम्फी थिएटर उभारून सातत्यपूर्ण नाट्यप्रयोग व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला पाहिजे
 • रंगकर्मींनी एकत्रिपणे सामूहिक सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास सांस्कृतिक चळवळ वाढेल. परिणामी, नाशिकचे सांस्कृतिक वैभव बहरेल

 

नाट्यकर्मी काय म्हणतात ?

मिनी थिएटर आणि अ‍ॅम्फी थिएटर काळाची गरज आहे. प्रत्येक प्रभागात समाज मंदिराबरोबर १०० ते १५० आसन व्यवस्था असलेले व सर्व सोयींने परिपूर्ण मिनी व अ‍ॅम्फी थिएटर असावे. त्या ठिकाणी व्याख्याने, एकांकिका, काव्यवाचन, नृत्य, वाद्यवादन, गायन, नाट्यवाचन, विविध सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करता येतील. शिवाय, अनेक कलाकारांना आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल. : प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा

नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने बदलत्या काळानुसार शहरातील विविध विभागांमध्ये अ‍ॅम्फी थिएटर असले पाहिजेत. कालिदास कलामंदिराशेजारी अ‍ॅम्फी थिएटरसाठी जागा आरक्षित आहे. याप्रकरणी अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेने महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. अ‍ॅम्फी थिएटरमुळे नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होईल. : सुनील ढगे, कार्यवाह, मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा

नाशिक शहराला अ‍ॅम्फी थिएटर म्हणजे समीप थिएटरची गरज आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात अ‍ॅम्फी थिएटर होवू शकते. उद्याने, समाजमंदिरांमध्ये अ‍ॅम्फी थिएटर उभारता येतील. नवीन नाशिकसह उपनगरांमध्ये अ‍ॅम्फी थिएटर झाल्यास नागरिकांना मनोरंजनासह समाजप्रबोधनपर विविध नाटके बघता येतील. शिवाय, हौशी व प्रायोगिक रंगकर्मींना व्यासपीठ मिळेल आणि प्रयोगांची संख्यासुद्धा वाढेल. : सुहास भोसले, दिग्दर्शक

नाशिकसह राज्यभर अ‍ॅम्फी थिएटरची गरज आहे. नाट्यसंस्कृती रूजवण्यासाठी हौशी व प्रायोगिक रंगभूमीला छोटेखानी थिएटरमुळे बळ मिळेल. नाशिक शहरात मिनी थिएटर झाल्यास अर्थकारण बसायला मदत होईल. मोठे नाट्यगृह आर्थिकदृया अनेक रंगकर्मींना परवडत नाही. इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी, गंगापूररोड भागात अ‍ॅम्फी थिएटर व्हावेत. त्यासाठी राजाश्रयाची गरज असून, हे थिएटर्स उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घ्यावा. : सचिन शिंदे, दिग्दर्शक

नाशिक शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मिनी थिएटर व अ‍ॅम्फी थिएटरची गरज आहे. नवोदित कलावंतांना अ‍ॅम्फी थिएटरमुळे व्यासपीठ मिळते. शिवाय, आर्थिक बजेट कोलमडत नाही. अ‍ॅम्फी थिएटर नाटकाशी संलग्न नाट्यमंदिरांच्या आवारातच असले पाहिजे. पुणे व मुंबईत नाट्यगृहांचे लोकेशन चांगल्या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्येही असायला हवेत. : राजेंद्र जाधव, संचालक, नाट्यसेवा संस्था, नाशिक

नाशिक शहरात सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी अ‍ॅम्फी थिएटर झाली पाहिजेत. कुसुमाग्रज स्मारकात साहित्य, सांस्कृतिकसह विविध क्षेत्रातील नागरिक येत असतात. या ठिकाणी अ‍ॅम्फी थिएटर होवू शकते. त्यासाठी रंगकर्मींनी पुढाकार घेतला पाहिजे. अ‍ॅम्फी थिएटरची मागणी करण्यापूर्वी रंगकर्मींनी सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रयोगांना सुरूवात करावी. त्यानंतर एकत्र येत अ‍ॅम्फिथिएटरसाठी पुढाकार घ्यावा. : चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शक