विशेष भाग १०/ उपभाग १ : घटस्फोट रोखण्यासाठी समुपदेशनाचा ‘बुस्टर डोस’

नाशिक : गेल्या पाच वर्षांत तब्बल १० हजार घटस्फोट झाल्याची बाब ‘आपलं महानगर’ने पुढे आणली आणि या बातमीमुळे अनेकांनी चिंताही व्यक्त केली. घटस्फोटाची कारणे, त्याचे होणारे परिणाम यावर स्वतंत्र लेखमालाही ‘आपलं महानगर’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. हा प्रश्न येथेच सोडून न देता वाढत्या घटस्फोटांना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी आम्ही वाचकांसह शहरातील मानोसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि अनुभवी वकीलांकडून मते मागवली. विवाहापूर्वी जर मुला-मुलीचे समुपदेशन करण्यात आले तर विवाहानंतरच्या घटस्फोटांच्या प्रमाणात नक्कीच घट होईल. शिवाय घटस्फोटाचा विचार ज्यांच्या मनात येत असेल किंवा घटस्फोटाची पहिली पायरी ज्याने चढली असेल त्याचे समुपदेशन झाल्यास बहुतांश प्रकरणांमध्ये हे घटस्फोट होणारच नाहीत, असा निष्कर्ष तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेअंती निघाला. यावर ‘आपलं महानगर’ने टाकलेला प्रकाशझोत..

तज्ज्ञांच्या चर्चेअंती निष्कर्ष; विवाहपूर्व आणि विवाहानंतर समुपदेशकांचा सल्ला आवश्यक
५ वर्षात १९७४ जोडप्यांची जुळली मने

कौटुंबिक न्यायालयात २०१८ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत घटस्फोटासाठी दाखल केलेल्या दाव्यांमधील तब्बल एक हजार ९७४ जोडप्यांचे मन जुळली असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल करण्यापूर्वी समुपदेशन, पुनर्विचारासाठी दिलेला सहा महिन्यांचा कालावधीत, सहा महिन्यांनी न्यायालयात पुन्हा समुपदेशनामुळे घटस्फोटाचा निर्णय रद्द करत एक हजार ९७४ जोडप्यांची मने जुळवण्यात समुपदेशकांना यश आले आहे. ही आकडेवारी घटस्फोटांच्या तुलनेत कमी असली तरी दरवर्षी तडजोड दाव्यांचाही आकडा वाढत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. शहर कौटुंबिक न्यायालयात गेल्या पाच वर्षांमध्ये दाखल दाव्यांची माहिती घेतली असता तब्बल 10 हजार 14 दाव्यांमध्ये जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची धक्कादायक तितकीच गंभीर बाब पुढे आली आहे.

विवाहपूर्व समुपदेशनाची नेमकी गरज काय?

लग्नासाठी जोडीदार निवडताना बराच वेळा सखोल माहिती करतानाच, जोडीदाराची बौद्धिक, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि सर्वात महत्त्वाचे मानसिक आरोग्य या संबंधित विचार करणे गरजेचे असते. अनुरूपता पडताळताना जोडीदाराशी आणि त्याच्या कुटुंबाशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे असते.फक्त पत्रिका, आणि नातेवाईक किंवा ओळखीचे लोक यांजकडून घेतलेल्या माहितीवर अवलंबून न राहता . प्रत्यक्ष भावी जोडीदाराशी संवाद साधणे, तसेच त्याच्या आवडी -निवडी , त्याचे आचार- विचार, घरातील वातावरण, त्याचे घरातिल व्यक्तींशी तसेच सामाज्याशी असलेले संबंध, त्याचा स्वभाव, क्षमता, इत्यादी अनेक बाबतीमध्ये लक्षपूर्वक बघावे लागते. हे करत असतानाच जोडीदाराला समजून घेणे व त्यासाठी गाठी भेटी होणे महत्त्वाचे असते. बराच वेळा आपल्या अपेक्षा व जोडीदारच्या अपेक्षा यांची पडताळणी करणे गरजेचे असते. कुठल्याही प्रकारची ग्वाही जोडीदाराला न देता, स्वतःतील क्षमता तसेच कमतरता यांबद्दलची माहिती द्यावी व घ्यावी. हे सर्व करतानाच बहुतांश वेळा सामुपादेशनाचा फायदा होतो.

विवाहानंतरच्या समुपदेशनाने नेमके काय घडू शकते?

पती-पत्नी मधील नातेसंबध व त्याचा घरातील वातावरणावर, कुटुंबावर, कामावर आणि समाजावर होणारा परिणाम या संबंधित मार्गदर्शन हे तज्ञ समुपदेशक करतो. बराच वेळा कौटुंबिक भांडणे, पती-पत्नी मधील गैरसमज, तक्रारी तसेच अपेक्षांचे ओझे, विसंवाद, यांमध्ये समाजातील इतर व्यक्तींची झालेली लुडबुड, या आणि इतर अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम हा जोडप्यांच्या वैवाहिक संबंधावर झालेला दिसून येतो. या साठीच्या समायोजनासाठी समुपदेशन करून घेणे ही काळाची गरज आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही.

काही निरीक्षणे….

  • विवाहानंतर अवघे दोन महिने, एक वर्ष, तीन वर्षाच्या आत घटस्फोटांचे दावे न्यायालयात सर्वाधिक दाखल आहेत
  • कोरोनाकाळात नोकरी नसल्याने, आर्थिक परिस्थिती खालावल्याने मिळेल ती रक्कम पत्नीने तडजोड म्हणून स्विकारत घटस्फोट घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत
  • सामाजिक प्रतिष्ठेसाठी विवाह सोहळे हॉल व लॉन्समध्ये मोठ्या खर्चात होतात. पण त्यातीलच अनेक जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत
  • पती-पत्नी उच्च शिक्षित व मोठ्या पगारावर असल्याने अनेकांचे एकमेकांशी पटत नाही, त्यातून लगेच घटस्फोट घेतला जात आहे
  • नाशिक शहरात असेही जोडपी आहेत की, ज्यांचा जोडीदार बदलूनही दरवर्षी घटस्फोटासाठी येतात. पतीची संपत्ती व खावटी मिळण्यासाठी अनेकांनी घटस्फोट घेतला आहे.
क्रमशः 

पुढील भागात वाचा तज्ञ काय म्हणतात