विशेष भाग ९ : घटस्फोटानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांचीच होते सर्वाधिक वाताहत

नाशिक : किरकोळ कारणातून वाद टोकाला गेल्यानंतर घेतलेल्या घटस्फोटांमध्ये पुरुषांच्या तुलनेत विभक्त कुटुंबातील महिलांची सर्वाधिक वाताहत होत असल्याचे समुपदेशकांच्या निदर्शनास आले आहे. घटस्फोटीत महिला स्वावलंबी नसेल तर तिला शारीरिक, मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तिला सासरी किंवा माहेरी सन्मानाची वागणूक दिली जात नाही. घटस्फोटामुळे ती नकोशी वाटू लागते. शिवाय, तिच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचे संबंधितांनी सांगितले.

कोणतीही विवाहित महिला पटकन घटस्फोट द्यायला तयार नसते. ती अत्याचार, त्रास, घुसमट सोसून संसार टिकविण्याचा प्रयत्न करते. ती जेव्हा घटस्फोटाचा मार्ग अवलंबते, तेव्हा तिला अत्याचार, त्रास आणि घुसमटीतून सुटका करून घ्यायची असते. माणूस म्हणून तिला जगायचे असते. मात्र, तिला घटस्फोटानंतर एकल पालकत्व, आर्थिक समस्येसह अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. घटस्फोटाचा दावा दाखल झाल्यानंतर तिचे समाजात एक स्त्री म्हणून असलेले स्थान पणाला लागते. पुरुष तिच्याकडे वाईट नजरेने पाहतात. तर महिला तिच्याकडे संशयाने पाहू लागतात. यामध्ये तो कितीही वाईट असला, तरी घटस्फोट कशाला घ्यायचा, ती तसलीच आहे, आता नवर्‍याची आडकाठी नाही, असे तिला तोंडावर किंवा तिच्या पाठीमागे बोलले जाते.

घटस्फोटीत महिलेला गरजेनुसार घटस्फोटानंतर निर्वाहभत्ता मिळाला पाहिजे, अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र, निर्वाहभत्ता तिला सहजासहजी देण्याची नवर्‍याची इच्छा नसते. त्यामुळे निर्वाहभत्ता अजिबात न देणे, वेळेवर न देणे, अर्धवट देणे अशा गोष्टी तो करायला लागतो. त्यातून तिची आर्थिक परिस्थिती बिकट होते. घटस्फोटानंतर महिलेला स्वत:ची जागा असेल, तर प्रश्न येत नाही. पण घटस्फोट झाल्यानंतर तिला भाडेतत्वावर जागा देण्यास लोक तयार होत नाहीत. घटस्फोटानंतर अपत्याचा ताबा तिच्याकडे राहिला, तर एकल पालकत्वाचे दिव्य तिला पार पाडावे लागते. तिचा आणि अपत्याचा निर्वाहभत्ता वेळेवर न मिळाल्यास दोघांचीही आर्थिक सोय करण्यापासून ते बाबा आता आपल्यासोबत का नाहीत, हे समजावून सांगण्यापर्यंत अनेक गोष्टींचा तिला सामना करावा लागतो. सुट्टीच्या काळात सासरकडच्यांनी अपत्याची मागणी केल्यास काळजावर दगड ठेवून मुलाला त्यांच्याकडे पाठवावेच लागते. मुले परत आल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या मानसिक परिणामांनाही तिला तोंड द्यावे लागते.

घटस्फोटांच्या निर्णयामुळे स्वावलंबी व हायप्रोफाईल महिलेस कमी अडचणी येतात. मात्र, घटस्फोटीत महिला स्वावलंबी नसेल, ती एकत्र कुटुंबातील नसेल तर तिला शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. घटस्फोटाचा निर्णय घेण्यापूर्वी जोडप्याने दूरगामी विचार केला पाहिजे. : अ‍ॅड. योगेश मांडे, विधीज्ञ

पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे. एकमेकांना वेळ दिला पाहिजे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये घटस्फोटाचा निर्णय झटपट घेतला जात आहे. कारण त्यांना समजून सांगण्यास कोणीही नसते. घटस्फोटामुळे पती, पत्नीसह मुलांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घतस्फोटाआधी दोघांनी दूरगामी विचार केला पाहिजे. महिला स्वावलंबी नसेल तर तिला मानसिक, आर्थिक व सामाजिक समस्येस सामोरे जावे लागते. : अ‍ॅड. शरद मोगल, विधीज्ञ