नाशिक : महापालिका आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून राजकीय नेत्यांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी शहरभरात जोरदार होर्डिंगबाजी सुरू झाली आहे. या होर्डिंगबाजीमुळे वाहतुकीचा खोळंबा आणि संपूर्ण शहराचे विद्रुपीकरण सुरू असतानाही पोलीस आणि महापालिका आयुक्त मात्र ढिम्म बसून आहेत. ज्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आज तेच उजळ माथ्याने होर्डिंग्ज लावत असल्याने मुलांनी काय आदर्श घ्यावा, असा संतप्त सवालही नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवजयंतीनिमित्त शहराच्या प्रत्येक चौक, मैदाने आणि दुभाजकांमध्ये बॅनर्स आणि पोस्टर्स लावून स्वतःची चमकोगिरी करण्याचा उद्योग सुरू होता. मुख्य रहदारीच्या चौकांमध्ये, वळण रस्त्यांवरदेखील मोठ-मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, होर्डिंग्ज लावणारे अनेक व्यक्ती हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याकडे पोलीस आयुक्तांसह महापालिका आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. नवीन नाशिकमध्ये होर्डिंग्जमुळे चांगलाच राडा झाला.
या होर्डिंग्जमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच वाहतुकीसाठीदेखील ही बाब धोकादायक असल्याचे माहित असतानाही पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. अशा भूमिकेमुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस परवानगी घेताना अनेक मंडळांनी नियमांचे पालन करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि विचारांना फाटा दिल्याचे दिसून आले. जयंतीउत्सवात कायदा व सुव्यवस्थेचे सरळ-सरळ उल्लंघन झाले. त्याचा त्रास नागरिकांना झाला.
नियमांचा देखावा
शिवजयंतीला अनेक सुज्ञ नाशिककरांनी मंडळांना भेटी दिल्या त्यावेळी त्यांना बहुतांश मंडळांचा भर हा केवळ भव्यता, चमकोगिरी आणि स्टंटबाजीवर होता. अनेक मंडळांच्या ठिकाणी कोणतेही प्रबोधन व विधायक उपक्रम दिसले नाही.
चोर सोडून संन्याशाला फाशी
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार्यांवर पोलिसांनी रहदारीस अडथळा केल्याचे कारण देत कारवाई केली होती. आता शहरभरात हजारो होर्डिंग्जमुळे वाहतुकीला अडथळा होत असतानाही कारवाईसाठी पोलीस आता कोणत्या मुहूर्ताची वाट पाहताहेत, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. तात्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अनधिकृत बॅनर लावणार्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे शहरातील अनधिकृत बॅनरबाजी थांबली होती. तात्कालीन पोलीस आयुक्त पाण्डेय आता नाशिकमध्ये असते तर गुन्हेगारांची चांगलीच पाचावर धारण बसली असती आणि होर्डिंग्ज लावण्याची हिंमतही झाली नसती आणि यंत्रणांना वेढीस धरत भव्य देखावे उभे करणार्यांना पाण्डेय यांनी परवानगीच दिली नसती अशी चर्चा खुद्द पोलीस कर्मचार्यांत सुरू आहे.
अपघातांची जबाबदारी कुणाची?
लहान-मोठ्या होर्डिंग्जने दुभाजक, वाहतूक बेट व वळण रस्तेदेखील व्यापले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. तसे झाल्यास या होर्डिंग्जला परवानगी देणारे किंवा त्याकडे डोळेझाक करणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.