स्पेशल रिपोर्ट : लालपरीची दूरवस्था, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

दिलीप सूर्यवंशी । नाशिक

रस्त्यात कुठेही बंद पडणारी बस, ब्रेकफेल झालेली बस, बसच्या छतामधून पडणारे पाणी, गोटा झालेले टायर, फुटलेल्या काचा, खिडक्यांचा खडखडाट, कपड्याने बांधलेले आरसे, दोरीने बांधलेले बंपर, सीट्सबाहेर आलेले कुशन आणि तोडक्या मोडक्या अवस्थेतील सीटस्, धावताना सुटणारे धुराचे लोट आणि गिअर टाकताना येणारा प्रचंड आवाज… अशा दूरवस्थेमुळे कोटींची उड्डाणे घेणारी लालपरी स्वतः संकटात आहेच शिवाय प्रवाशांचाही जीव धोक्यात घालून धावतेय. प्रवाशांच्या सेवेसाठी… सुरक्षित अन् सुखकर प्रवासासाठी हे ब्रीद आता केवळ नावापुरतेच राहिल्याचे दुर्दैवी चित्र आहे. एसटीच्या अशा परिस्थितीमुळे खासगी वाहतुकीला मात्र सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळेच वाट पाहिन पण एसटीनेच जाईन, ही राज्य सरकारची घोषणा हवेत विरते की काय, अशी वेळ येऊन ठेपली आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील यापेक्षा वेगळी स्थिती नाही. एसटीच्या या दूरवस्थेवर टाकलेला हा प्रकाशझोत…

डेपोतून सुटणार्‍या बसेस ठक्कर बसस्थानक किंवा सीबीएस बसस्थानकात येतात. येथे स्टॉपवर बस उभी राहिल्यानंतर बसेसची दूरवस्था लक्षात येते. एसटीवर जिल्हावासियांचा आजही विश्वास आहे पण महामंडळाला प्रवाशांची किंमत नसल्याचे दिसते. शहरी भागात आलिशान किंवा वातानुकूलीत बस धावल्या म्हणजे प्रशासनाची जबाबदारी संपते असे नाही. नवीन गाड्या शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील जुन्या गाड्या ग्रामीण भागात पाठविल्या जातात. या बसेस ग्रामीण भागात प्रवास करताना कुठे बंद पडतील याचा भरवसा नाही. काही वेळेला तर एका बसचा पार्ट दुसर्‍या बसला लावून ती चालू ठेवते जाते. यामुळे चालक ही वैतागून जातात. चालकांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग अनेकदा यामुळे उद्भवतात. कधी कधी वाटेतच टायर पंचर होणे, एखादा पार्ट काम करणे बंद होणे, यामुळे एसटीचा त्याच गावात मुक्काम होणे यामुळे प्रवासी संताप व्यक्त करतात. काही वेळेला पार्ट मिळत नसल्याने दुरुस्ती रखडते त्यामुळे एसटीच्या फेर्‍या रद्द कराव्या लागतात.

कोट्यावधींची उड्डाणे घेणार्‍या एसटीला आलेले वाईट दिवस बघून निश्चितच वाईट वाटते. दुसरीकडे एसटी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच अनेकदा प्रवासी अधिक भाडे मोजून खाजगी वाहतुकीकडे वळतात यामुळे एसटीचे नुकसान होत आहे याकडे महामंडळापासून मंत्र्यांपर्यंत कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येते. अशा एक ना अनेक घटना दररोज घडत असताना महामंडळाने बसच्या दुरावस्तेवर चुप्पी साधली आहे. बंद पडलेल्या बसचे तोडेसे काम करुन ती चालु करायची अन रस्त्यावर आणायची. लाखो रुपये कमवून देणार्‍या एसटीच्या मेन्टेनन्सवर महामंडळाकडून लक्ष देण्यात येत नसल्याने एसटीला दूरवस्ता प्राप्त झाली आहे. एकीकडे राज्य शासनाने महिलांसाठी 50 टक्के प्रवासाची सवलत जाहीर केली आहे मात्र दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत आहेत.

चार महिन्यांपासून योजना कागदावरच
  • प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या एसटीला सध्या दुर्देवी अवस्था प्राप्त झाल्याचे दिसत आहे. एका बसचे आसन फाटलेले, दुसर्‍या बसचे पत्रे फाटलेले तर तिसर्‍या बसमध्ये पत्र्याचा, आसनाचा नटबोल्ट सैल झालेला दिसतो. बसचा जागोजागचा रंग निघालेला, पुसट झालेला. त्यामुळे आजारी व्यक्ती जसा अडखळत, कन्हत चालतो. तशा या बस धडधड… खडखड… आवाज करीत प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे अशा बसची संपूर्ण दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबईत चार महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. बसची दुरुस्ती, डागडुजी, रंगरंगोटी करून त्यांना आकर्षित करण्याचे ठरले होते. बसमधील काही प्रवाशांना तंबाखू, पान, खर्याच्या पिचकार्‍या मारण्याची सवय असते. परिणामी बसमध्ये कोंदट, उग्र दुर्गंध येतो. त्यामुळे आसनव्यवस्था आरामदायक, नियमित स्वच्छता करून बस स्वच्छ अन् चकचकीत करायची, अशी योजना होती. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित अन् प्रसन्न प्रवासाची अनुभूती मिळेल आणि ते मोठ्या प्रमाणात बसमध्ये येतील, अशी यामागे कल्पना होती. मात्र, चार महिने उलटूनही ही योजना कागदावर राहिली.
  • जवळपास 30 प्रकारच्या सवलती राज्य सरकारकडून देण्यात येतात. या सवलतीची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून महामंडळाला करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळांकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या प्रवाशांच्या तिकीट दरातील शुल्क प्रतिपूर्ती महाराष्ट्र सरकार करणार आहे.
शिवशाहीची वाट बिकट

महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी वातानुकूलीत शिवशाही राज्य शासनाने मोठ्या ताटामाटात सुरू केली. मात्र, आज शिवशाहीची अवस्ता बिकट आहे. बंद पडणारे एसी, एसीतून पाण्याची धार प्रवाशांच्या अंगावर, अनेक शिवशाही बसेसचे खराब झालेले सीटस्, जुने झालेले टायर्स यामुळे शिवशाहीला दुरवस्था प्राप्त झाली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर बसची दोन चाके निखळली

मंगळवारी (दि. 16 मे) पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव एसटीचे दोन चाके निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महामार्गावर एसटी धावत असतानाच तिचे एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. या बसमध्ये 35 प्रवासी होते. पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीत ही घटना घडली. या घटनेचे फोटो समोर आले आहेत. महामार्गावर बस धावत असतानाच बसची मागची दोन्ही चाके निखळली होती. त्यानंतर काही वेळ बस तीन चाकांवर धावत होती. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस अलगद रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. बसचे चाके निखळल्यानंतर बस रस्त्यावरच तिरपी धावत होती. या दरम्यान बसचा खालचा भाग रस्त्यावर घासला गेला. त्यामुळे मोठ्या ठिणग्या उडाल्या. अचानक ही घटना घडल्याने बसमधील प्रवासीही घाबरले. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. मात्र, यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

सीबीएसपासून एक किलोमीटरवर शिवशाही नादुरुस्त

रविवारी (दि. 21 मे) नाशिक शहरातील मुंबई नाका महामार्ग बसस्थानकातून नाशिकमार्गे बोरिवलीकडे निघालेली शिवशाही बस एक किलोमीटर जात नाही तोच बंद पडली त्यामुळे प्रवाशांचा तीव्र संताप झाला. बसचा एसी बंद पडल्याने प्रवाशांचा जीव गुदमरायला लागला. चालकाने बस त्वरित एसटी डेपोत नेली. मात्र, डेपोच्या गेटवर प्रवाशी एक तास खोळंबले. बदलून नवीन बस आणण्यासाठी चालकाला सुमारे एक तास लागला यामुळे भर उन्हात 40 ते 42 डिग्री तापमानात प्रवासी ताटकळत उभे राहिले. डेपोमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था नाही की पाणी नाही, यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले शेवटी रडकुंडीस आले. सुमारे एक तासाने बस आली मात्र बस आल्यानंतर बसमध्ये डिझेल आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला. प्रवाशांनी चालकाला डिझेल पुरेल की नाही असा प्रश्न विचारला. चालकाने शाश्वती दिल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 18 तारखेला गुरुवारी त्रंबक नाका सिग्नल वर शिवशाही अचानक बंद पडली. यामुळे वाहतुकीचा पेच निर्माण झाला. अचानक शिवशाही बंद पडल्याने प्रवाशांना बस स्थानकात उतरण्याऐवजी त्रंबक नाका येथेच उतरावे लागले यामुळे प्रवाशांना हातात जड सामान आणि बॅगा घेऊन बसस्थानकापर्यंत चालत जावे लागले.

ताई, माई, आक्कांचा प्रवास सुसाट…

एसटी प्रवासातील सवलतीबाबत शासनाने घोषणा 9 मार्चला केली तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन आदेशाची (GR) आवश्यकता असते. या आदेशाचा जीआर शुक्रवारी (दि.17 मार्च) काढण्यात आला. एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात आली. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्क्यांची सूट दिली आणि राज्यातील एसटीमध्ये महिला प्रवासी संख्या झपाट्याने वाढली. पहिल्याच चार दिवसात राज्यभरात तब्बल 48 लाख महिला प्रवाशांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास केला आहे. जो एकूण प्रवासी संख्येच्या 30 टक्के आहे. एकट्या परभणीत 65 हजार तर धाराशिवमध्ये 57 हजार महिलांनी चार दिवसात या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यभरातील अनेक बस स्थानकावर आणि बसमध्येही महिला प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. ताई, माई, अक्का, काकू, मावशी आणि आजी सगळ्या प्रवासाला निघाल्या. कुणी देवस्थानाला कोणी जात आहे तर कुणी वास्तुशांतीसाठी जातेय. कुणी पर्यटनाला निघाले तर कोणी रोजच्या प्रवासामुळे होणार्‍या वैयक्तिक खर्चात कपात करण्यासाठी निघालेय. कुणी रुग्णालयात तर कुणी बाजारला निघालेय. घरातील कामधाम सर्वच आटोपून सकाळीच या महिला तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहेत. साधी बस असो की शिवशाही या गाडीमध्ये अर्धे तिकीट आकारले जात असल्यामुळे महिला प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कायम तोट्यात असते, त्याची विविध कारण आहेत. त्यातील महत्वाचे कारण म्हणजे विविध घटनांना दिल्या जाणार्‍या सवलती. महामंडळाकडून आतपर्यंत 39सवलती दिल्या जात होत्या. ज्यात आता 75 वर्षावरील नागरिकांना मोफत आणि आता महिलांना 50% तिकीट सवलत दिली जात आहे.